मुंबई - 26/11 मुंबईवर झालेला सर्वात भीषण दहशतवादी हल्ला. या हल्ल्याच्या रात्री सीएसएमटी रेल्वे स्टेशनात अंदाधुंद गोळीबार करून कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याच पुलावरून उतरून कामा हॉस्पिटलकडे गेले होते आणि हॉस्पिटलबाहेर राहत असलेल्या एका घरात कसाबने पिण्यासाठी पाणी मागितले होते. या दुर्घटनाग्रस्त पुलामुळे पुन्हा एकदा २६/११ च्या कटू आठवणी जाग्या झाल्या.
टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगच्या बाजूने ते जात असताना एका फोटोग्राफरने कसाबचा फोटो टिपला होता. त्यावेळी फ्लॅश उडाल्याने कसाबने खिडकीच्या दिशेनेही गोळी झाडली होती. त्यानंतर ते पुढे कामा हॉस्पिटलमध्ये शिरले. करकरे, कामटे, साळसकर हे पोलीस अधिकारी शहीद झाले. पोलिसांच्या गाडीत बसून कसाब आणि त्याचा साथीदार पुढे निघून गेले. नंतर स्कोडा गाडीतून गिरगाव चौपाटीच्या दिशेने येणारा कसाब जिवंत सापडला तर अबू इस्माईलला गोळ्या झाडून पोलिसांनी ठार केले. य झटापटीत पोलीस तुकाराम ओंबळे हे शहीद झाले.
त्यानंतर बरेच दिवस कसाब याच पुलावरून गेला होता बरं का? अशी माहिती मुंबईकर पर्यटकांना आणि पाहुण्यांना द्यायचे. त्याचप्रमाणे कसाब पूल आणि काम हॉस्पिटलच्या गल्लीला कसाब गल्ली म्हणून काही लोक बोलू लागले. आजही रात्रीच्या अंधारातून या ठिकाणाहून जाताना अंगावर शहारा आणणाऱ्या २६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याची भीती मनात दाटून येते.