Mumbai CST Bridge Collapse: अचानक पूल हलण्याचा आवाज होऊ लागला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 05:02 AM2019-03-15T05:02:15+5:302019-03-15T05:02:37+5:30

कटरच्या साहाय्याने ढिगारा फोडला

Mumbai CST Bridge Collapse: Suddenly there was a noise flowing through the bridge and ... | Mumbai CST Bridge Collapse: अचानक पूल हलण्याचा आवाज होऊ लागला आणि...

Mumbai CST Bridge Collapse: अचानक पूल हलण्याचा आवाज होऊ लागला आणि...

Next

मुंबई : नेहमीप्रमाणे ठरलेली लोकल पकडण्यासाठी त्यांची धावपळ सुरु होती. लोकल प्लॅटफॉर्मवर आल्यावर त्या दिशेने धावण्याच्या तयारीत काहीजण पुलावरच उभे होते. अचानक पूल हलण्याचा आवाज होऊ लागला आणि काही कळण्याआधीच छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पादचारी पुलाचा ६० टक्के भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेले प्रवाशी जीवाच्या आकांताने ओरडू लागले आणि त्यांच्या किंकाळीने परिसर हादरला.

दादाभाई नौरोजी मार्गावर हिमालय हा १९८० मधील पादचारी पूल आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर हा पूल ‘कसाब पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. रेल्वे मार्गाला जोडणारा हा महत्वाचा पूल असल्याने दररोज लाखो प्रवाशांची या मार्गावरून ये- जा सुरु असते. त्यामुळे नेहमीच विशेषत: संध्याकाळच्या वेळी हा पूल गजबजलेला असतो. गुरुवारी संध्याकाळी ७.३० वाजता या पुलावर प्रवाशांची वर्दळ सुरु होती. तर काही फेरीवाले पुलाच्या जिन्यांवर बसलेले होते. अचानक पुलाचा ‘कर कर’ आवाज होऊ लागला आणि काही क्षणात या पुलाचा मधला भाग कोसळला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

पूल कोसळत असताना त्याचवेळी सिग्नल लागल्यामुळे त्या पुलाखाली अर्ध्या भागात वाहने नव्हती. मात्र त्या पुलाखालून वळणाऱ्या टॅक्सीवर ढिगारा कोसळून पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल, महापालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले. या मार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. सिमेंट कॉंक्रिटचा ढिगारा उपसून त्याखाली जखमींना काढण्यात येऊ लागले. कटरच्या सहाय्याने ढिगारा फोडून एक-एक जखमींना बाहेर काढण्यात येऊ लागले. त्याखाली अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यामुळे संपूर्ण परिसरात घाबरहाट पसरली.

पुलाचा उर्वरित भाग पाडला
लोखंडी खांबावर काँक्रिटचे स्लॅब टाकून हा पूल बांधण्यात आला आहे. मात्र या पुलावरील कॉंक्रिटचा ६० टक्के भाग कोसळल्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे ढिगारा उपसून जखमींना रुग्णलयात नेल्यानंतर या पुलाचा उर्वरित भाग पालिकेने पाडला. या पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढून प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

राजकीय लोकप्रतिनिधींची गर्दी
पुलाच्या दुर्घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी धाव घेतली. त्यानंतर एका पाठोपाठ एक राजकीय नेते, राज्यमंत्री, महापौर, मुखमंत्री यांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे सत्ताधरी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेºया सुरु झाल्या. आमदार वारीस पठाण भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी या पुलाचे चुकीचे आॅडिट करणाºया अधिकाºयाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

आर्थिक मदत
शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री विनोद तावडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन या घटनेची चौकशी करण्यात येईल व जखमींना वैद्यकीय उपचार तातडीने देण्यात येणार असून मृतांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात येईल, असे सांगितले. काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी भेट देऊन या घटनेला सरकार, पालिका व रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला.

या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकर आराम मिळावा ही सदिच्छा. जखमी व मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या दुर्घटनेत झालेल्या जीवित हानीबाबत तीव्र दु:ख आहे. अकाली प्राण गमवावे लागलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना चांगले आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना करत आहे.
- विद्यासागर राव, राज्यपाल

पादचारी पुलाच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जखमींवर उपचार करण्यासाठी रेल्वेचे वैद्यकीय पथक, मदतकार्याला रेल्वेचे अधिकारी महापालिकेच्या अधिकाºयांसोबत सहकार्य करत आहेत.
- पीयूष गोयल, रेल्वेमंत्री

या दुर्घटनेतील मृतांना विनम्र श्रद्धांजली. कुटुंबीयांच्या दु:खात सामील आहे. घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- अरविंद सावंत, स्थानिक खासदार

या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी अधिकाºयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. कुणाचाही बचाव करण्यात येणार नाही.
- सुभाष देसाई, पालकमंत्री, मुंबई शहर

अंधेरी व एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर काहीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे या अपघातातून सिद्ध झाले आहे. रेल्वेमंत्री मात्र नेहमीप्रमाणे आपण कसे चौकशीचे आदेश दिले याची टिमकी वाजवतील व जबाबदारी झटकतील. - राज ठाकरे, मनसे प्रमुख

मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळून ५ जणांना जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी वारंवार आम्ही केली होती, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
- धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद

या पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये किरकोळ दुरुस्ती सुचविण्यात आली होती. ही दुरुस्ती काही कालावधीनंतर सुरू करण्यात येणार होती. मात्र दुरुस्ती सुरू होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडली.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

हा पूल रेल्वेच्या मालकीचा असून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही या पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला कळविले होते. मात्र रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही व उत्तरदेखील मिळालेले नाही.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

या पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणाºया अधिकाºयांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवावा. या अहवालात किरकोळ दुरुस्ती सुचविल्याने या अहवालाचा दर्जा समोर आला आहे.
- मिलिंद देवरा, माजी केंद्रीय मंत्री

३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असणाºया महापालिकेच्या ताब्यातील पूल अशा प्रकारे दुरुस्तीअभावी कोसळून पाच जणांचा मृत्यू होणे ही लाजिरवाणी बाब आहे. जे दोषी असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई करून त्यांना निलंबित करावे.
- अ‍ॅड. वारीस पठाण, आमदार

निष्काळजीपणा दाखवणाºया अधिकाºयांविरोधात कडक कारवाई करावी व त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.
- राज पुरोहित, आमदार

स्ट्रक्टरल आॅडिटमध्ये किरकोळ दुरुस्त्या सुचविल्या होत्या. या दुरुस्त्यांनादेखील विलंब झाला. या दुर्घटनेसाठी पालिकेचे इंजिनीअर जबाबदार आहेत.
- रईस शेख, गटनेता, समाजवादी पक्ष

आजचे बळी हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.
- मिलिंद पांचाळ,
तनिष्का सामाजिक संस्था

जबाबदारीवरून टोलवाटोलवी
सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळून सहा मुंबईकरांचे बळी गेले असतानाच दुर्घटनाग्रस्त पूल नेमका कोणाचा, यावरून आता नेहमीचाच वाद सुरू झाला आहे. दुर्घटनेचे वृत्त येताच रेल्वे प्रशासनाने हा पादचारी पूल रेल्वेच्या हद्दीबाहेर असल्याचे म्हटले. तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावा केला. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

जखमींची नावे : सोनाली नवाले (३०), अद्वित नवाले (३), राजेंद्र नवाले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडीत (३१), हर्षदा वागळे (३५), विजय भागवत (४२), निलेश पटावकर (३०), परशुराम पवरा (४०), मुबलीक जयस्वाल, मोहन मोझडा (४३), अनोळखी (३२), आयुषी राणा (३०), सिराज खान (५५), राम कुक्रेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत जाधव (१९), अभिजीत माना (२१), राजकुमार चावला (४९), सुभेश बॅनर्जी (३७), रवी शेट्टी (४०), नंदा कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तर खान (४५), सुजर माजी (२३), कानुभाई सोलंकी (४७), दिपक पारेख

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल पुढे रेल्वे फलाटालाही जोडला जातो. फलाट क्रमांक १ वरील पादचारी पुलाच्या जीर्ण भागाचे हे छायाचित्र २२ फेब्रुवारी रोजी श्रीपाद आगाशे यांनी टिपले होते. त्यावरून पादचारी पुलाची दुरवस्था स्पष्ट दिसते.

Web Title: Mumbai CST Bridge Collapse: Suddenly there was a noise flowing through the bridge and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.