Mumbai CST Bridge Collapse: हा पूल क्रूरकर्मा कसाबला फाशीपर्यंत घेऊन गेला होता...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:18 PM2019-03-15T12:18:06+5:302019-03-15T12:29:28+5:30
कसाब आणि अबू इस्माईल 'कल्याण एन्ड'ला आले आणि स्टेशनातून बाहेर पडण्यासाठी या पुलाकडे नेणारा जिना चढले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनाबाहेरील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी भरगर्दीच्या वेळी कोसळला आणि सहा निष्पाप मुंबईकरांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेत ३३ जण जखमीही झालेत. पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं असतानाही हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मुंबईकरांच्या जिवाला काही किंमत आहे की नाही, असा संतप्त सवाल विचारला जातोय. सीएसएमटीचा हा कोसळलेला पूल २००८ मध्ये चर्चेत आला होता, तो दहशतवादी कसाबमुळे आणि कसाबला फाशीपर्यंत घेऊन जाण्यात या पुलानंही महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
२६/११ च्या रात्री कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईलनं सीएसटी स्टेशनात अंदाधुंद गोळीबार केला. लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तिथे शेकडो प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यानंतर, कसाब आणि अबू इस्माईल 'कल्याण एन्ड'ला आले आणि स्टेशनातून बाहेर पडण्यासाठी या पुलाकडे नेणारा जिना चढले. कामा हॉस्पिटलकडे जाणाऱ्या गल्लीत ते पुलावरून उतरत असताना, शेजारच्या टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगमधून फोटोग्राफरने कसाबचा फोटो घेतला होता. हा फोटो काढताना फ्लॅश उडाल्यानं कसाबनं टाइम्स बिल्डिंगच्या खिडकीच्या दिशेनंही गोळी झाडली होती.
काल कोसळलेल्या सीएसटी पुलाच्या पायऱ्या उतरतानाचा कसाबचा फोटो असून त्याचा चेहरा त्यात स्पष्टपणे दिसतोय. त्यामुळे २६/११ खटल्यात कसाबला दोषी ठरवण्यासाठी हा फोटो ठळक पुरावा ठरला होता. सीएसटी स्टेशनवरील फोटोंमध्ये कसाबचा अर्धाच चेहरा दिसतोय. पण, या फोटोने पूर्णसत्य जगापुढे आणलं, पाकिस्तान उघडा पडला आणि कसाब फासावर लटकला.
"त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचलेhttps://t.co/jzVzuUTebl
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 15, 2019
#MumbaiBridgeCollapse : पादचारी पूल कोसळल्यानंतरची विदारक दृ्ष्यhttps://t.co/1wCQPM8BWj#mumbaibridgecollaps#csmt#cst
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 14, 2019