Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 08:44 AM2019-03-15T08:44:48+5:302019-03-15T08:46:19+5:30

ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे.

Mumbai CST Bridge Collapse: "Those" red signals saved many lives | Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले

Mumbai CST Bridge Collapse: "त्या" रेड सिग्नलमुळे अनेकांचे जीव वाचले

googlenewsNext

मुंबई - ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. गुरुवारी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुल कोसळल्याच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा अधिक लोक या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.  

सीएसएमटी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी लावण्यात आलेला ट्रॅफिक सिग्नलने या दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवले. त्या रेड सिग्नलमुळे अनेक गाड्या थांबल्या आणि मोठी जीवितहानी टळली. जर हा रेड सिग्नल लागला नसता तर पादचारी पूल कोसळण्याच्या वेळी अनेक गाड्या या पुलखालून जात असत्या. मात्र रेड सिग्नलमुळे दुर्घटनेच्या वेळी पुलाखाली जास्त वाहन नव्हती असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

सीएसएमटी परिसर हा वर्दळीचा परिसर आहे, संध्याकाळच्या वेळी याठिकाणी वाहनांची तसेच लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. संध्याकाळच्या सुमारास कामावरुन सुटलेला चाकरमानी घरी जाण्यासाठी निघालेला असतो त्यामुळे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर वाहनांच्या अनेक रांगा लागलेल्या असतात. ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली त्या मार्गावरुन अनेक वाहने उपनगरात येण्यासाठी येत असतात. मात्र रेड सिग्नल लागल्यामुळे अनेक वाहने थांबली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा एक टॅक्सीचालक त्या पुलाखालून जात होता. सुदैवाने पुलाचा स्लॅब टॅक्सीच्या समोरच्या भागावर कोसळल्याने टॅक्सीचालक बचावला पण टॅक्सीचे नुकसान झाले. या टॅक्सीचालकानेही सांगितले की, जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा बीएमसीच्या मुख्य रस्त्यावर सिग्नल लागला होता. त्यामुळे अनेक वाहने थांबलेली होती. पुलाखाली वाहनांची संख्या कमी होती. 

या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दुर्घटना प्रकरणी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबईतील पुलांचे ऑडिट करु असे आश्वासन दिले होते.यानंतर मी महापालिका आयुक्तांनाही भेटलो. त्यांनी देखील सहकार्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच घडले नाही, हे सिद्ध झाले अशी टीका राज यांनी केली आहे

Web Title: Mumbai CST Bridge Collapse: "Those" red signals saved many lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.