मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालय पादचारी पूल दुर्घटनेतील मृतांना प्रशासनाने पाच लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मात्र या पाच लाख रुपयांत मृत पावलेल्या जाहिदच्या सहा महिन्यांच्या चिमुरडीला बाबा कुठून आणू? अशी आर्त भावना त्याचे वडील सिराज खान यांनी व्यक्त केली आहे.
जाहिदला दोन मुली आहेत. पैकी एक सहा महिन्यांची आहे. वास्तव्यास दामोदर पार्क येथे असलेला जाहिद अधिकतर वेळ नित्यानंद नगरमध्ये असायचा. त्यामुळे या ठिकाणी त्याचा मोठा मित्र परिवार होता. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ पट्टा आणि पाकीटचे दुकान चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
त्याच्यामागे असलेल्या दोन भावांसह कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यामुळे जाहिदच्या जाण्याने त्याच्या पत्नीसह कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. दुर्घटनेवेळीही सीएसएमटी येथे सामान आणण्यास गेलेला जाहिद वडिलांसह चालत होता. पुलावरील गर्दी पाहून एका बाजूने चालण्याची विनंती त्याने वडिलांना केली.
मात्र काही क्षणांत पुलाचा भाग कोसळला. यात जाहिदचा जागीच मृत्यू, तर वडील सिराज यांच्या जबड्यासह पाठीला जबर मार लागला आहे. घरातील एक कर्ता पुरुष रुग्णालयात आणि दुसरा दगावल्याने कुटुंबाला सावरायचे कसे, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे.