मुंबई, दि. 7 - मुंबईच्या जुहू येथे बांधकाम सुरू असलेल्या एका 13 मजली इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने इमारतीला आग लागली . यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत. जखमींना कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती असून अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास येथील प्रार्थना इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग लागली. तेथे असलेल्या लाकडी आणि भंगाराच्या साहित्यामुळे आग भडकली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर ताबा मिळवला. पण या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. जखमी आणि मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे कामगार असल्याची माहिती आहे. जखमींवर कूपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.