बैलगाडा शर्यतीसाठी चाकणच्या आंदोलनाला डबेवाल्यांचा पाठिंबा, काळी फित लावून केलं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 02:00 PM2017-10-28T14:00:10+5:302017-10-28T14:03:49+5:30
बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाली पाहिजे म्हणुन चाकण येथे होणा-या बैलगाडा मालकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरीही मुंबईच्या डबेवाल्यांनी त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे
मुंबई - बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु झाली पाहिजे म्हणुन चाकण येथे होणा-या बैलगाडा मालकांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरीही मुंबईच्या डबेवाल्यांनी त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शनिवारी मुंबईत लोअर परेल येथील डबेवाल्यांनी काळी फित लावून काम केले.
बैलगाडा शर्यत ही आमची परंपरा आहे ज्या गावातून आम्ही मुंबईला आलो त्या गावात ही परंपरा पाळली जाते. गावच्या ग्रामदैवताची यात्रा असली की बैलगाडा शर्यत व कुस्त्यांचा आखाडा हे कार्यक्रम ठरलेले असतात. पण बैलगाडा शर्यत बंद झाली आणी गावच्या यात्रेची शोभा गेली ती शोभा व परंपरा परत मिळावी म्हणुन गाडा मालक व बैलगाडा शर्यत प्रेमी चाकण येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला मुंबईचा डबेवाल्यांचा जाहीर पाठींबा आहे अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
बैल शर्यतीत धावला तर त्याचा त्याला त्रास होतो असे न्यायालयाचे व प्राणिमित्र संघटनाचे म्हणणे आहे. मग न्यायालयाला व या प्राणीमित्र संघटनांना घोडे शर्यतीत धावलेले कसे चालतात ? या घोड्याच्या रेस वर हजारो करोडाचा जुगार चालतो. जर भुतदया दाखवायची असेल तर ती सर्व प्राणीमात्रांवर दाखवले गेली पाहीजे. देशांतील सर्व कत्तलखाने बंद केले पाहीजे असं सुभाष तळेकर बोलले आहेत.
बैलगाडा शर्यत राज्यात पुन्हा सुरू करावी यासाठी सर्वपक्षीय नेते आज एकत्रित आले. पुण्यातील चाकण चौकात बैलगाडा शर्यतीसाठी जोरदार आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी तळेगाव चौक येथे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनामुळे वाहनांच्या 2 ते 3 किमीच्या रांगा रस्त्यावर लागल्या.
सरकारने शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलं. अनेक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सरकारनं अध्यादेश काढून राज्यात बैलगाडा शर्यत सुरु केली होती. तसेच प्राण्यांना इजा न होता, शर्यती घ्याव्या असंही राज्य सरकारनं सुचवलं होतं. मात्र प्राण्यांसंबंधी काम करणाऱ्या पेटा या सामाजिक संस्थेनं त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवर पुन्हा एकदा बंदी आली.