मुंबई - मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लोकांना वेळेवर डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले येत्या 15 एप्रिलपासून सहा दिवसांच्या सुट्टीवर चालले आहेत. त्यामुळे डब्बे घेणाऱ्या मुंबईकरांनी आधीच आपली सोय करुन घ्यावी.
डबेवाले ज्या गावातून मुंबईला आले ती गावे मुळशी,मावळ,खेड,आंबेगाव, जुन्नर, जिल्हा पुणे तर अकोला, संगमनेर जिल्हा अहमदनगर या भागतील आहेत. सध्या या जिल्ह्यांमध्ये यात्रेचे दिवस सुरु आहेत. यात्रेसाठी मुंबईतील डबेवाले आर्वुजन गावी जातात. त्यामुळे डबेवाल्यांनी सोमवार 15 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत मुंबईत जेवणाचे डबे पोहचवण्याची सेवा बंद ठेवली आहे या सहा दिवसाच्या सुट्टीत महावीर जयंती व गुडफ्रायडे या दोन सरकारी सुट्यां आहेत. या दोन सुट्या ६ दिवसाच्या सुट्यातून वगळल्या तर खऱ्या अर्थाने डबेवाले 4 दिवस सुट्टी घेणार आहेत
सुट्टीनंतर 22 एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला आपल्या ठराविक वेळेत तो कामावर हजर होईल. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळ्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे डबेवाल्यांची सेवा काही प्रमाणात बंद आहे. मात्र डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे त्याबद्दल डबेवाले असोसिएसनकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांनी डबेवाल्यांच्या सुट्टीचा पगार कापू नये अशी मागणीही मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.