पाणी मारूनही शिवाजी पार्कमध्ये धुळवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 01:35 PM2023-04-07T13:35:50+5:302023-04-07T13:35:57+5:30
पालिकेकडून रोज तीन लाख लीटर फवारणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर शिवाजी पार्क येथील धुळीच्या समस्येने हैराण झालेल्या स्थानिकांना दिलासा मिळावा म्हणून महापालिकेने पाण्याचा उतारा शोधला आहे. मैदानातील धूळ उडू नये यासाठी पालिकेकडून दररोज २.९० लाख लीटर पाण्याची फवारणी केली जात आहे. मैदानावर पाणी मारूनही धुळीची समस्या मात्र कायम आहे.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आजवर अनेक खेळाडू घडले. हे मैदान विविध राजकीय सभांचे साक्षीदार असून गेल्या काही वर्षांपासून येथील रहिवाशांना मैदानातील धुळीचा सामना करावा लागत आहे. या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीदेखील जमिनीची धूप सुरूच आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने या मैदानात पाण्याची फवारणी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन टप्प्यांत मैदानात पाणी मारले जायचे. मात्र, रहिवाशांच्या मागणीवरून गेल्या पाच महिन्यांपासून एकाचवेळी पाणी फवारले जाते.
रात्री साडेदहा ते पहाटे साडेचार या वेळेत पालिकेच्या जी उत्तर वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडून पाण्याची फवारणी सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली जाते, अशी माहिती दुय्यम अभियंता अनिल चव्हाण यांनी दिली. तरीही धूळ उडते अशी माहिती नागरिकांनी दिली.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी
मैदानात पाण्याचा मारा करण्यासाठी दररोज २.९० लाख लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी लागते. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून साठविलेले पाणी या कामासाठी वापरले जाते. त्यासाठी मैदानात काही ठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची सोय करण्यात आली आहे तसेच कूपनलिकेचीही मदत घेतली जाते.