मुंबई : परीक्षा संपल्याने अभियांत्रिकी आणि वास्तुविशारद शाखेचे शिक्षण घेत असल्याने तीन मित्रांनी मुंबई दर्शनाचा बेत आखला. रात्री झूम कार बुक करून तिघेही नवी मुंबईहून मुंबई दर्शनाला निघाले. मुंबई दर्शनाचा आनंद लुटून वसतिगृहाकडे परतत असताना, चालकाचा डोळा लागला आणि कार रेलिंगवर चढली. रेलिंग कारच्या आरपार गेल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वडाळा फ्री वेवर बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी मृत कारचालकावर गुन्हा दाखल केला.या अपघातात अलिबागचा रिषभ जैन आणि कोल्हापूरच्या प्रणीत शहाचा मृत्यू झाला आहे, तर अभिजित जैनची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे तिघेही बेलापूरच्या वसतिगृहात एकत्र राहायचे. यामध्ये रिषभ हा पिल्लई महाविद्यालयात वास्तुविशारद शाखेचे शिक्षण घेत होता. तर प्रणीत आणि अभिजीत सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. मंगळवारी तिघांची परीक्षा संपल्याने ते आपआपल्या घरी जाणार होते. त्यापूर्वी मुंबई दर्शनाचा बेत त्यांनी आखला होता. त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री कार बुक केली. मुंबई दर्शनाचा आनंद घेतल्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास ते वसतिगृहाच्या दिशेने निघाले. या वेळी प्रणीत कार चालवत होता, तर अभिजित त्याच्या बाजूच्या सीटवर आणि रिषभ मागच्या सीटवर बसला होता. या वेळी फ्री वेवरून जात असताना, पहाटे पावणेपाचच्या सुमारास प्रणीतचा डोळा लागला आणि कार रेलिंगवर चढली. या भीषण अपघातात रिषभ आणि प्रणीत तिघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिघांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रणीत आणि रिषभचा मृत्यू झाला, तर अभिजितची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई दर्शन बेतले विद्यार्थ्यांच्या जीवावर; फ्री वेवर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 5:49 AM