गार वारा झेलत मुंबई दर्शन सुरूच राहणार; बेस्ट नवीन ओपन डेक बसची खरेदी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:17 PM2023-09-07T12:17:55+5:302023-09-07T12:18:19+5:30
प्रवाशांचा मिळतोय चांगला प्रतिसाद
मुंबई : पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली ओपन डेक बस येत्या ऑक्टोबरमध्ये सेवेतून हद्दपार होणार आहे. मात्र त्या माध्यमातून मुंबईकरांचे होणारे मुंबई दर्शन बंद होणार नाही याची खात्री बेस्ट उपक्रमाने दिली आहे. मुंबईकरांचा आणि मुंबई बाहेरील पर्यटकांचा ओपन डेक बसगाड्यांमधून मिळणारा वेगळा अनुभव तसेच ‘मुंबई दर्शन’ बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद विचारात घेता, बेस्ट उपक्रमातर्फे नवीन दुमजली ओपन डेक’ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रक्रियाही बेस्ट उपक्रमाकडून सुरू करण्यात आलेली आहे.
मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी आणि विविध पर्यटनस्थळे पर्यटकांना झटपट पाहता यावी, तसेच उत्पन्नवाढीसाठी म्हणून बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने २६ जानेवारी १९९७ रोजी नॉन एसी ओपन डेक बस सुरू केली. या बसमध्ये अपर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. पूर्वी ओपन डेक बसमधून मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ओपन डेक बसगाडीतून पर्यटनसेवा सुरू करण्यात आली. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उकाड्यामुळे बदल करण्यात आला. त्यानंतर बसच्या फेऱ्या सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठपर्यंत होऊ लागल्या. प्रत्येक महिन्याला साधारण २० हजार पर्यटक याचा आनंद घेतात.
या ठिकाणांचा समावेश
दक्षिण मुंबईतील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, एन.सी.पी.ए, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे ओपन डेक बसमधून पर्यटकांना दाखवण्यात येतात. या बसच्या अप्पर डेकसाठी प्रति प्रवासी १५० रुपये आणि लोअर डेकसाठी ७५ रुपये शुल्क आकारले जात आहे.