लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग पुढे जेएनपीटीपर्यंत नेण्यात येणार असून हा हरित महामार्गाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तर, मुंबई-गोवा महामार्ग वर्षभरात खुला होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणासाठी आवश्यक भूसंपादनासह विविध परवान्यांसदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या बैठकीनंतर माध्यमांना गडकरी यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. केंद्र शासनाच्या वार्षिक आराखड्यानुसार राज्यात २,७२७ कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आणखी ५ हजार ८०१ कोटी रुपयांची कामे राज्यात होणार आहेत. मुंबई-दिल्ली महामार्गाचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून यापूर्वीच्या नियोजनानुसार हा मार्ग मुंबईच्या सीमेपर्यंतच प्रस्तावित होता. आता तो वाढवून जेएनपीटीपर्यंत नेला जाणार आहे. या प्रकल्पात भूसंपादनाची रक्कम मोठी असून राज्य सरकारने यातील काही भार उचलावा, अशी आमची मागणी होती. यावर, राज्य सरकारने या महामार्गासाठी लागणाऱ्या सिमेंट आणि पोलादावरचा वस्तू व सेवा कर तसेच कच्च्या मालावरील रॉयल्टी माफ करण्याची तयारी दाखविल्याचे गडकरी यांनी सांगितले. तब्बल १ लाख कोटी रुपये किमतीच्या या महामार्गामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर बारा तासात कापता येणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या १८० किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. पनवेल-इंदापूर मार्गावर असलेल्या अडचणी सुटल्या आहेत. त्यामुळे या मार्गाचे ७० ते ७५ टक्के काम झाले असून एक वर्षाच्या आत मुंबई-गोवा चौपदरी महामार्ग खुला होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावरील वाहतुकीमुळे मुंबई आणि पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचा नवीन मार्ग तयार करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
सुरतवरून नाशिक ते अहमदनगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई-बंगळुरू असा हा मार्ग असणार आहे. यासाठीच्या भूसंपादनाला सुरुवात होत आहे. या महामार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीचा भार मुंबईवर पडणार नाही असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरपासून आळंदी आणि देहूपर्यंत असलेला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर सिमेंट काँक्रीटचा मार्ग ठरेल, अशा पद्धतीने बनविला जात आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाच्या बाजूला वारकऱ्यांना पायी चालण्याची सुविधा असेल. येत्या दोन महिन्यात याची सर्व कामे दिली जातील. रस्ते विकास करताना पर्यावरण समतोल आणि प्राण्यांच्या संरक्षणालाही प्राधान्य देण्यात येत आहे. नागभीड-उमरेड-गडचिरोली-चंद्रपूर-चिमूर-वरोडा या ठिकाणी प्राण्यांना सुरक्षित जाता यावे यासाठी १७० कोटी रुपये खर्चून व्यवस्था उभारण्यात येणार आहेत. नागपूर-जबलपूर रस्त्यावर ११०० कोटी रुपये खर्च करून पेंच अभयारण्यातील प्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग उभारल्याचेही गडकरी यांनी सांगितले.