Corona Virus: सॅल्यूट! मुंबईतील नायर हॉस्पीटलमध्ये १ हजारहून अधिक कोरोनाग्रस्त गर्भवतींची यशस्वी प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:32 PM2021-05-05T12:32:19+5:302021-05-05T12:32:50+5:30
Corona Virus Mumbai Updates: देशात कोरोनाचा विस्फोट झालेला असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांसाठी देवदूत ठरत आहेत.
Corona Virus Mumbai Updates: देशात कोरोनाचा विस्फोट झालेला असताना डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांसाठी देवदूत ठरत आहेत. गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन सेवेत असलेले सर्व वैद्यकीय कर्मचारी जीवाचं रान करुन कोरोना संकट काळात काम करत आहेत. यातच मुंबईतील कोरोना लढ्यात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. मुंबईतील पालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत १ हजार कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वीरित्या प्रसूती झाली आहे. कोरोनाच्या महामारीत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती करणारं नायर रुग्णालय हे देशातील पहिलं रुग्णालय ठरलं आहे.
मुंबईतील मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय हे पालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालय असून कोरोना महामारीच्या काळात रुग्णालयाचं मोठं योगदान राहिलं आहे. कोरोना काळात नायर रुग्णालयात आतापर्यंत १०२२ कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांची प्रसूती झाली आहे. यात १९ जुळ्या आणि एका तीळ्या चिमुकल्यांचाही समावेश आहे.
नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग गेल्या वर्षभरापासून न थकता न थांबता काम करत आहे. पाच दिवसांपूर्वीच नायर रुग्णालय पूर्णपणे कोरोना रुग्णांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नायर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीजवळच तात्काळ पर्यायी कर्मचारी कक्ष देखील उभारण्यात आला. यात रुग्णालयाच्या लक्षात आलं की केवळ एक नव्हे, तर दोन पर्यारी कक्ष उभारावे लागतील. यातील एकामध्ये कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांवर उपचार करता येतील. त्यानुसार प्रशासन कामाला लागलं आणि तशी तयारी करण्यात आली. आज नायर रुग्णालयात वसई, विरार, पालघर आणि रायगड जिल्ह्यातूनही कोरोनाग्रस्त गर्भवती महिला उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांची यशस्वीरित्या प्रसूती देखील केली जात आहे.