गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:17 AM2024-07-22T11:17:19+5:302024-07-22T11:17:44+5:30

मुंबईत आणखी एका व्यापाऱ्याने समुद्रात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.

Mumbai Diamond merchant end his life by jumping into sea near Gateway of India | गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण...

गेटवे ऑफ इंडियाजवळ हिरे व्यापाऱ्याने संपवलं आयुष्य; दोनवेळा सी लिंकवर गेला पण...

Mumbai Crime : मुंबईत चार दिवसांपूर्वी एका व्यावसायिकाने वांद्रे वरळी सी लिंक येथून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता आणखी एका व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतूनच समोर आला आहे. आठवड्यातील दुसऱ्या घटनेत, दक्षिण मुंबईतील ६५ वर्षीय हिरे व्यापाऱ्याने रविवारी सकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव संजय शांतीलाल शहा असे असून ते महालक्ष्मी येथील शीला अपार्टमेंटमध्ये राहत होते. संजय शहा हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह राहत होते. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या कार्यालयातून शाह हिऱ्यांचा व्यवसाय करत होते. रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे. 

दोनदा सी लिंकवर टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न

संजय शाह यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांचे मोठे नुकसान झालं होतं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. "रविवारी सकाळी सातच्या सुमारास शाह मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचा दावा करून घरातून निघाले. त्यानंतर त्यांनी टॅक्सी पकडली आणि ड्रायव्हरला वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितले. शाह यांनी सुरुवातीला वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पूजेशी संबंधित फुले समुद्रात फेकण्याच्या बहाण्याने शाह यांनी दोनदा सी लिंकवरुन टॅक्सी नेली. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरला अनेकवेळा सी लिंकवर गाडी थांबवण्याची विनंती केली. पण टॅक्सी चालकाने वाहतूक अधिकाऱ्यांकडून मोठा दंड बसण्याच्या शक्यतेमुळे गाडी सी लिंकवर थांबवली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर संजय शाह यांनी टॅक्सी चालकाला गेटवे ऑफ इंडिया इथे सोडण्यास सांगितले.  ९.३० च्या सुमारास शाह गेटवे ऑफ इंडियाजवळ पोहोचले आणि त्यांनी समुद्रात उडी मारली. प्रत्यक्षदर्शीने तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले.

सकाळी समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्यामुळे शाह यांना वाचवणे अधिकाऱ्यांना कठीण झाले. नंतर दोरीने शाह यांना बाहेर काढून सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Mumbai Diamond merchant end his life by jumping into sea near Gateway of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.