- मनोहर कुंभेजकर
मुंबई - देशभरात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस! म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून गरीब कुटुंबातील लग्न ठरल्यानंतर ते आर्थिक चणचणीमुळे लग्न होऊ न शकलेल्या जोडप्यांना विवाह बंधनात अडकवण्यात येणार आहे. या निमित्ताने 18 अल्पसंख्यांकसह इतर जाती-धर्मांच्या जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळा गुरुवारी (14 फेब्रुवारी) उत्साहात साजरा केला जाणार आहे. प्रत्येक जोडप्याला 1.50 लाख रुपयांचे दागिने, बेडपासून ते गृहपयोगी वस्तू, भांडी, मिक्सर भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. तसेच या जोडप्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणात 20 शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. वेसावा कोळी वाड्याच्या बस स्टॉपच्या मागील बाजूस असलेल्या ग्राउंडवर 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 ते 10 या वेळात साजरा होणाऱ्या या विवाह सोहळ्याला सर्व जाती धर्मांचे सुमारे 15000 नागरिक, फिल्मी हस्ती आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना या विवाह सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून त्यांच्या चिमुरड्यांना खेळण्यासाठी खास किड्स झोन येथे तयार करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 66च्या नगरसेविका मैहर हैदर आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिन हैदर यांनी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.विवाह ठरल्यानंतर आर्थिक चणचणीमुळे गरीब कुटुंब आपल्या कन्येचा विवाह वेळेत करू शकत नाही त्यांच्यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती हैदर दाम्पत्यांनी दिली. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही हा सर्व जाती धर्माच्या जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतो, अशी माहिती त्यांनी दिली.