मुंबईः दिंडोशीतल्या अरुण कुमार वैद्य मार्गावर बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. गोरेगाव स्टेशनवरून नागरी निवारा परिषद येथे जात असणाऱ्या ३४४ नंबरच्या बसनं अचानक पेट घेतला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे स्वतःचे प्राण वाचवले आहेत. आगीचं कारण अद्याप कळलेले नाही. अग्निशमन दलाने लागलीच आग विझवली. त्यानंतर आता या बर्निंग बस दुर्घटनेची चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.गोरेगाव (पूर्व.) रेल्वे स्थानक ते नागरी निवारा परिषद या बस क्रमांक 344 बसला लागलेल्या आगीची बेस्ट प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी केली. या बसमध्ये कोणी प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे अश्या घटना घडू नये, याची दक्षता बेस्ट प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी प्रभू यांनी लोकमतशी बोलताना केली. या बसला आग कशी लागली, बसमध्ये काही दोष होता का?, बसची आगारातून निघण्यापूर्वी तपासणी झाली होती का ?, असा सवाल प्रभू यांनी बेस्ट प्रशासनाला विचारला आहे.
मुंबईतल्या दिंडोशीत बसनं घेतला पेट, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:43 PM