Join us

आता दिव्यांग ही करणार झोमॅटोची डिलिव्हरी; स्नेहज्योतने मिळवून दिल्या आधुनिक दुचाकी!

By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2024 5:21 PM

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत.

मुंबई : हल्ली घरोघरी झोमॅटो मार्फत डिलिव्हरी व्यवसाय जोरात सुरु असून आता या व्यवसायात दिव्यांग व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठी स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानने निओमोशनची आधुनिक दुचाकी वाहने दिव्यांगांना उपलब्ध करून दिली आहेत. 

बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर मध्ये कार्यालय असलेल्या  स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग पुनर्वसन कार्यासाठी समर्पित आहे. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या हिंमतीवर अर्थार्जन करून सक्षमपणे आपले आयुष्य व्यतीत करण्यासाठी दिव्यांगांना विविध कौशल्यामध्ये पारंगत करण्यापासून ते त्यांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय इत्यादी गोष्टींमध्ये भरभक्कम पाठिंबा उभ्या करण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टी स्नेहज्योत तर्फे करण्यात येतात.

 दिव्यांग व्यक्तींसाठी स्पेशली डिझाईन केलेल्या इलेक्ट्रिकल व्हेईकल वरून झोमॅटो फूड डिलिव्हरीचा व्यवसाय दिव्यांग व्यक्तींनाही करता येऊ शकतो का, याचा प्रयोग वर्षभरापूर्वी स्नेहज्योत संस्थेने केला. 

 या पहिल्या टप्प्यामध्ये हरिशंकर शर्मा, निजामुद्दीन आणि प्रवीण शिंदे या दिव्यांग सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व अडचणींवर मात करीत आपले मासिक उत्पन्न झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या माध्यमातून जवळजवळ 25 हजार रुपये पर्यंत नेले. त्यांच्या या स्वयंपूर्ण होण्याच्या प्रवासातून प्रेरणा घेत स्नेहज्योतने मागील आठवड्यात तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना या झोमॅटो फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरवले आहे. यामध्ये एक दिव्यांगना शुभांगी मोधले सुद्धा आहे.

जवळजवळ  1,20,000 रुपये किंमत असलेल्या या दूचाकी साठी एच टी पारीख फाउंडेशनने 1,10,000 रुपयांची मदत केली व उर्वरित दहा हजाराची मदत संस्थेचे शुभचिंतक, विदुला वैद्य, सुरेश मनोहर आणि सुजय अरगडे यांनी केली.

हा संपूर्ण कार्यक्रम बोरिवली पूर्व येथील चोगले हायस्कूलमध्ये संपन्न झाला.  ज्यामध्ये चोगले हायस्कूलचे कार्यवाह  संजय डहाळे व सुमेध डहाळे यांनी अनमोल सहकार्य केले.

स्नेहज्योत संस्थेच्या पुढाकाराने तब्बल 16 दिव्यांग व्यक्तींना अर्थार्जन करून स्वयंपूर्ण होण्यासाठी एक नवीन क्षेत्र खुले झाले असल्याचे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या सचिव सुधा वाघ यांनी सांगितले. मुंबई व्यतिरिक्त राज्यात दिव्यांग व्यक्ती झोमॅटोच्या व्यवसायात यापूर्वीच उतरल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

टॅग्स :मुंबईझोमॅटो