मुंबई : मागील आठवड्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असल्याने मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. दिवाळीच्या दिवसांत घसादुखीचा त्रास ओढवल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांनी आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुंबईत ‘व्हायरल फिव्हर’चे रुग्ण वाढू लागले आहेत. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. अनेक रुग्णांना घशाचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात सतत बदल होत आहेत. अचानक हवेत गारवा निर्माण होतो तर काही क्षणांत घामाच्या धारा वाहू लागतात. या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढत आहेत. दवाखान्यांसह रुग्णालयांमध्येही व्हायरल फिव्हर आणि घशाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवाळीच्या दिवसांत काही ठिकाणी फटाक्यांच्या धुरामुळेही घशाचा संसर्ग होत असल्याच्या तक्रारी आहेत. दूषित पाण्याच्या माध्यमातून विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग होतो. या काळात पालकांनी लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. तसेच पालेभाज्या, फळभाज्यांसारखा हलका आहार घ्यावा. यंदाच्या वर्षी पावसाळा संपला असला तरीही साथीच्या आजारांचा जोर कमी झालेला नाही, असे फिजिशिअन डॉ. नेहा साळुंके यांनी सांगितले. बाहेरील अन्नपदार्थ टाळून समतोल आहाराचे सेवन करावे आणि ज्येष्ठ नागरिक, लहानग्यांची विशेष काळजी घ्यावी, असे डॉ. साळुंके यांनी सांगितले.