मुंबई : कच्च्या कैद्यांना विवस्त्र करून त्यांची अंगझडती घेणे हे त्यांच्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने आर्थर रोड कारागृहातील अधिकाऱ्यांना स्ट्रिप सर्चऐवजी स्कॅनर आणि अन्य उपकरणांचा वापर करण्याचे आदेश दिले. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद कमाल शेखच्या तक्रारीवरून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) न्यायालयाचे न्या. बी. डी. शेळके यांनी १० एप्रिल रोजी हा आदेश दिला. आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. न्यायालयातून कारागृहात परत नेल्यानंतर तेथील सुरक्षारक्षक विवस्त्र करून अंगझडती घेतात, अशी तक्रार शेख याने न्यायालयात केली. अंगझडतीला विरोध केल्यास सुरक्षारक्षक शिवीगाळ करतात, ही प्रथा अपमानास्पद असून गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग करणारी असल्याचेही शेखने नमूद केले. कारागृह प्रशासनाने शेखचे आरोप फेटाळून लावले. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने शेखने केलेल्या आरोपांत तथ्य असल्याचे स्पष्ट केले. अन्य कैद्यांनीही शेखच्या तक्रारीला दुजोरा दिला. त्यावर न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
स्कॅनर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण उपलब्ध नसेल आणि शारीरिक झडती घेणे आवश्यक असेल तर प्रशासनाने कच्च्या कैद्यांशी गैरवर्तवणूक करू नये किंवा अपमानास्पद वागणूक देऊ नये. तसेच त्यांना शिवीगाळही करू नये, असे न्यायालयाने म्हटले.