मुंबई: एका १७ वर्षीय मुलाच्या मुत्राशयातून १ किलोचा खडा काढण्यात आला आहे. मुंबईतील डॉ. राजीव रेडकर यांनी शस्त्रक्रिया करून हा खडा बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती. मात्र ती यशस्वीपणे पार पडल्यानं मुलाला जीवदान मिळालं. किडनीतून काढण्यात आलेल्या खड्याचं वजन १ किलो असून त्याचा आकार नारळाएवढा आहे. मुलाची प्रकृती आता स्थिर आहे.
कोलकात्यातील रुबेल शेख नावाच्या मुलाला एक्सस्ट्रोफी-एपिस्पेडियास कॉम्प्लेक्स (ईईसी) नावाचा आजार होता. डॉ. रेडकर यांनी रुबेलवर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याला जीवदान दिलं. ईईसी आजार अतिशय दुर्मिळ असून तो १ लाखातील एका व्यक्तीला होतो. डॉ. रेडकर यांनी रुबेलवर ३० जूनला शस्त्रक्रिया केली. आता रुबेलची प्रकृती ठीक आहे.
ईसीसी आजार झालेल्या व्यक्तीचं मूत्राशय योग्यपणे काम करत नाही. मूत्र साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्यानं मूत्र सांडत राहतं. डॉ. रेडकरांनी दुसऱ्यांदा रुबेलला जीवदान दिलं आहे. १५ वर्षांपूर्वी रेडकरांनी रुबेलवर उपचार केले होते. तेव्हा त्यांनी मुत्राशयाचा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. रुबेल मूत्रविसर्जन करू शकेल अशी व्यवस्था त्यावेळी डॉक्टरांनी केली.
पोटात तीव्र स्वरुपाच्या वेदना होत असल्यानं रुबेलनं जूनमध्ये डॉ. रेडकर यांना फोन केला. पोटदुखीचा त्रास होत असून मूत्रावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं रुबेलनं डॉक्टरांना सांगितलं. रुबेल त्याच्या नातेवाईकासोबत रेडकरांच्या दवाखान्यात आला. यानंतर ३० जूनला रेडकर यांनी रुबेलवर शस्त्रक्रिया केली.