लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात मराठी भाषेविषयी काढलेल्या उद्गारांंचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. विधानपरिषदेत त्यावरून मोठा गदारोळ झाला, कामकाज दोनवेळा तहकूब झाले. विधानसभेतही कामकाज रोखले गेले. तेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हुतात्मा स्मारकासमोर निदर्शने केली.
जोशी हे मूळ इंदूरचे (मध्य प्रदेश) आहेत; पण ते मराठी भाषिक आहेत. घाटकोपर; मुंबई येथील कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानामुळे शुक्रवारी दिवसभर टीकेची झोड उठली. शेवटी जोशी यांनी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्धीला दिले, त्यात त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा निर्विवादपणे मराठीच आहे, असे नमूद केले.
विधानसभेत उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांनी जोशी यांच्या विधानाचा मुद्दा उचलत जोशी यांच्याविरुद्ध राज्य सरकारने कारवाई करावी, हा मराठीद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे, अशी टीका केली. यावेळी मंत्री नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याने गदारोळात कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
आधी काय म्हणाले?
मुंबईची एक भाषा नाही, अनेक भाषा आहेत. त्या-त्या भागात ती-ती भाषा बोलली जाते. जसे मुंबईतील घाटकोपरची भाषा ही गुजराथी आहे. गिरगावमध्ये हिंदी भाषक जास्त नाहीत, तिथे मराठी भाषक आहेत. मुंबईत एक सोपे आहे की, इथे येणाऱ्या माणसाला मराठी शिकलेच पाहिजे, असे नाही.
नंतर काय म्हणाले?
मुंबईची भाषा मराठीच आहे यात वाद नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. मुंबईत राहणाऱ्या अन्य भाषकांनी मराठी शिकावी, वाचावी ही साहजिक अपेक्षा आहे. त्याचा आग्रहही धरला पाहिजे. मी मराठी भाषिक आहे आणि मराठी माझ्या अंत:करणात आहे.
महाराष्ट्रात मराठीच...
मुंबई - महाराष्ट्राची भाषा ही मराठीच राहणार हीच राज्य सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे, बोलता आली पाहिजे; मात्र आम्ही इतर भाषांचाही सन्मान करतो. ज्याचे आपल्या भाषेवर प्रेम असते तो इतरांच्या भाषेवरही प्रेम करतो. भैयाजी जोशी यांचे याबद्दल दुमत असेल असे मला वाटत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भूमिका स्पष्ट केली.
स्थगन प्रस्ताव फेटाळताच विधान परिषदेत गदारोळ
विधानपरिषदेत उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला; पण सभापती राम शिंदे यांनी तो फेटाळताच विरोधी पक्ष सदस्य आक्रमक झाले. मराठी भाषेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. मराठी भाषेवरील अन्याय, अपमानही सहन केला जाणार नाही. ‘आरएसएस’ला मराठी भाषेला, मराठी माणसाला डावलून मुंबईतील भागांचे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय असे भाषिक तुकडे करायचे आहेत का? असा सवाल करत सरकारने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी आ. परब यांनी केली.
काँग्रेसचे भाई जगताप यांनी आता मुंबईत विभागनिहाय भाषा वापरली जाणार आहे का? काही काळानंतर मुंबईचा कारभार हा गुजराती भाषेत होणार असल्याचे संकेत सरकार देत आहे का? असे प्रश्न केले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येत जोशींवर कारवाईची मागणी केली. यावरून दोन वेळा कामकाज तहकूब करावे लागले.
जोशी यांनी सभागृहाबाहेर वक्तव्य केले आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राची असून, राज्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ती असली पाहिजे; परंतु जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले.