मुंबईकडे पाण्याचा पर्यायच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:40 AM2019-05-22T00:40:46+5:302019-05-22T00:40:50+5:30
टँकरमाफियांचा व्यवसाय तेजीत : गळती व चोरी रोखण्यात महापालिका अपयशी
- शेफाली परब-पंडित
मुंबई : घराघरांत २४ तास पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची घोषणा दिवास्वप्नच ठरले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाण्याची गळती व चोरी रोखणे असे सर्व प्रकल्प पाण्याची गरज भागविण्यात निष्फळ आहेत. त्यामुळे आजही पावसाच्या पाण्यावर मुंबईची मदार आहे. या अडचणीचा फायदा उठवित टँकरमाफियांचा धंदा मात्र तेजीत आहे. तर दामदुप्पट पैसे मोजून मुंबईकरांना आपली तहान भागवावी लागत आहे.
गेल्या वर्षी तलावांमध्ये ९१ टक्के जलसाठा जमा झाला होता. हा जलसाठा वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी पुरेसा नसल्याने १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र पाणीचोरी व गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्के असल्याने दररोज सुमारे ९०० दशलक्ष लीटर पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यात गाडी धुणे, कपडे-भांडी-लादी धुणे या कामांसाठी ६० टक्के पिण्याचे पाणी वाया जात आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कल पाहता, अशी परिस्थिती तीन-चार वर्षांमध्ये एकदा उद्भवत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ मध्ये मुंबईत पाणीप्रश्न पेटला होता. नागरिकांचे मोर्चे, तक्रारींनंतर झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने अपारंपरिक पद्धतीने पाणीसाठ्याच्या प्रकल्पांची आखणी केली. परंतु दुसऱ्या वर्षी चांगला पाऊस होताच या प्रकल्पांवर पाणी सोडले जात आहे. मध्य वैतरणा प्रकल्पामुळे दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणी वाढले. मात्र त्यानंतर नवीन प्रकल्पाला अवकाश असल्याने मुंबईसमोरील पाण्याचा प्रश्न जैसे थेच आहे.
पर्यायी नियोजनाची सद्य:स्थिती
रेन वॉटर हार्वेस्टिंग : छपरावरून गळणारे पावसाचे पाणी मोठ्या टाकीमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे करता येते़ २००२ मध्ये बंधनकारक करण्यात आलेल्या या प्रकल्पावर निम्म्या इमारतींमध्ये अंमलबजावणी झालेली नाही.
सांडपाणी पुन:प्रक्रिया प्रकल्प : औद्योगिक वसाहती, झोपडपट्ट्या व निवासी वसाहतींमधून दररोज २६०० दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होते़ यापैकी १६०० दशलक्ष लीटर सांडपाण्यावर पुन:प्रक्रिया करून ते समुद्रात सोडून देण्यात येते़ हे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरण्यात येणार आहे.
या वर्षीपासून या प्रकल्पावर काम सुरू होणे अपेक्षित होते.
विहिरींचा गैरवापर
विहिरीतील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी होऊ शकतो. परंतु देखभालीअभावी अनेक विहिरींमधील पाणी दूषित झाले आहे; काही ठिकाणी विहीर मालक टँकरमालकांना पाण्याची विक्री करतात.
गळती व चोरी रोखण्यात अपयश : पुणे शहराला दररोज ९०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. एवढे पाणी दररोज मुंबईत चोरी व गळतीद्वारे वाहून जाते. ही चोरी व गळती रोखण्याचे पालिकेचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत.
टँकर लॉबीकडून लूट
१८ ठिकाणी टँकर भरले जातात़ प्रत्येक वॉर्डात आपत्कालीन परिस्थितीसाठी एक टँकर राखीव ठेवण्यात आला आहे़ दक्षिण मुंबईत ३० ठिकाणी अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करून टँकर भरले जात असल्याचे आढळून आले. १० ते २० हजार लीटर पाण्यासाठी दक्षिण मुंबईत ६०० रुपये असलेला दर तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत पोहोचतो़ तर मध्य मुंबईत हाच दर १६०० ते १८०० असतो़ उपनगरांमध्ये १३०० ते १५०० रुपये आकारण्यात येतात़