मुंबई - मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली असून, या दुर्घटनेमध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही इमारत 100 वर्षे जुनी असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. म्हाडाच्या अखत्यारीत येणारी इमारत रहिवाशांनी पुर्नर्विकासासाठी बिल्डरला दिली होती. मात्र या बिल्डरने पुर्नविकासाचे काम वेळात सुरू केले होते की नाही, याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील दुर्घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त झालेली इमारत ही सुमारे 100 वर्षे जुनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. म्हाडाच्या अखत्यारीत असलेली ही इमारत स्थानिक रहिवाशांनी पुर्नविकासासाठी बिल्डरला दिली होती. मात्र या इमारतीचा तत्काळ खाली करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींमध्ये समावेश नव्हता. आता या इमारतीच्या दुरुस्तीचे काम बिल्डरने तातडीने सुरू केले होते की नाही याची चौकशी करण्यात येईल. मात्र सध्यातरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम प्राथमिकतेने करण्यात येईल.''
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या काही जणांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.