मुंबई - डोंगरी परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, ही इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले होते. त्यानंतर म्हाडाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून, सदर दुर्घटनाग्रस्त इमारत आपल्या कार्यक्षेत्रात नसल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी सांगितले की,''म्हाडाचा घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील डोंगरी येथील २५/C केसरभाई ही उपकरप्राप्त इमारत कोसळल्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाली आहे. मात्र डोंगरी येथील २५/C केसरभाई ही उपकरप्राप्त इमारत कोसळलेली नसून आजही सद्यस्थितीत उभी आहे. सदरील इमारत वास्तव्यास धोकादायक असल्याने सन २०१८ साली मंडळाने या इमारतीतील रहिवाशांना व्हेकेशन नोटीस देऊन रिकामी करवून घेतली आहे व सद्यस्थितीत ही इमारत उभी आहे. आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये २५/C केसरभाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला आहे. सदरील अनधिकृत बांधकाम उपकर प्राप्त नसल्याने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडत नाही.'' डोंगरी येथील इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 6:22 PM