लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सोमवारी ६३४ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत तीन लाख १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सोमवारी ३२१ दिवसांवर गेला आहे. रविवारी हा आकडा ३४६ दिवस होता. सध्या ७ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत ३१ लाख ४६ हजार ७२२ चाचण्या झाल्या आहेत. सोमवारी दिवसभरात ७६० रुग्ण आणि चार मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन लाख १९ हजार ८८८ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ४४६ झाला आहे.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या ५४ आहे. मागील २४ तासांत पालिकेने चार हजार ६४२ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.