वर्सोवा यारी रोडची मलनिःसारण वाहिनी अखेर दुरुस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 10:28 AM2018-07-22T10:28:25+5:302018-07-22T10:29:33+5:30
शिवसेना नगरसेविकेने दुरुस्तीसाठी केली नाईट शिफ्ट!
- मनोहर कुंभेजकर
मुंबई महानगर पालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. नगरसेवक म्हटले की,सकाळपासूनच लवकर त्यांचा दिवस वॉटर, मीटर व गटार या आलेल्या तक्रारींच्या पाढ्यापासून सुरू होतोे. विभागात वॉर्ड ऑफिसला जाणे, पालिका अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणे, पालिका मुख्यालयात सर्वसाधारण सभांना आणि अन्य महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहणे, संध्याकाळीआपल्या कार्यालयात येऊन रात्री उशिरापर्यंत नागरिकांना भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, घरी रात्री उशिरा परतल्यावर मग जेवण झाल्यावर 4 ते 5 तास झोप असा मुंबईतील नगरसेवकांचा दिनक्रम असतो. त्यात विभागातील कार्यक्रमांना उपस्थित राहणे, वाढदिवस, सत्यनारायण पूजा यांना जाणे तसेच दुःखाच्या प्रसंगात सुद्धा नगरसेवक जातीने उपस्थित असतात आणि मदतीचा हात देखील पुढे करून दुःखात असलेल्या विभागातील कुटुंबाला धीर देतात. असा नगर सेवकांचा सकाळी सुरू झालेला नगरसेवकांचा दिनक्रम रात्री उशिरा संपतो.मग दुसऱ्या दिवशी हे चक्र पुन्हा सुरू होते.
आज मुंबईतील 227 नगरसेवकांमध्ये 50 टक्के महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे महिला नगरसेवकांना सुद्धा पुरुष नगरसेवकांप्रमाणे विभागात नागरी सुविधांची कामे करावी लागतात,आपल्या कामाचा 5 वर्षात ठसा उमटवून परत आपल्या प्रभागात आणि आरक्षण पडले तर दुसऱ्या प्रभागात निवडून यायचे असते. सध्या पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची झालेली चाळण,गटारे भरणे,मलनिःसारण वहिनी चोकप होणे या तक्रारी मध्ये वाढ झाली आहे.
गेले काही दिवस वर्सोवा,यारी रोड येथील मदिना मस्जिद ते डी मार्ट या दरम्यान असलेल्या मुख्य मलनिःस्सारण वाहिनी चोकप झाल्यामुळे रस्त्यावर सांड पाणी ओसंडून वाहत होते.पावसामुळे के पश्चिम विभागाला दुरुस्ती करता येत नव्हती. पावसाने उसंत घेताच प्रभाग क्रमांक 59 च्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिमा खोपडे या चक्क येथील मलनिःस्सारण वहिनी पालिकेकडून दुरुस्त करून घेण्यासाठी आपले पती शैलेश खोपडे व शिवसैनिकांसोबत यारी रोडच्या रस्त्यावर नाईट शिफ्ट करून गेले काही दिवस येथील मुख्य रस्त्यावर वाहणारी मलनिःस्सारण युद्धपातळीवर काम करून दुरुस्त करून घेतली.
गेल्या शुक्रवारी मध्यरात्री 12 पासून सकाळी 6 पर्यंत जातीने विभागातील शिवसैनिकांना मदतीला घेऊन पालिका अधिकारी व पालिका कर्मचारी यांच्याकडून काम करून घेऊन हा रस्ता दुरुस्त करून घेतला.आता सध्या तरी येथील रस्त्यावर पाणी गेले दोन दिवस पाणी साचले नाही आणि येथील नागरिकांना दिलासा मिळाला अशी माहिती नगरसेविका खोपडे यांनी लोकमतला दिली. तर यारी रोड ते ओल्ड फिशरीज मार्गावरील गुलशन कॉलनी आणि जोसेफ पटेल वाडी या दरम्यान असलेला चोकअप काढून वाहणारे सांडपाणी थांबविले.के पश्चिम विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, महानगरपालिकेचे अधिकारी राणे व मांडवकर आणि शिवसैनिक शैलेश खोपडे ,फारूक भाई व अन्य उपस्थित होते. शिवसेनेच्या प्रयत्नांनी येथील मलनिःसारण वहिनी अखेर दुरुस्त झाल्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.