मुंबई - मुंबई ड्रग्स केस प्रकरणावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांची जात आणि धर्मावरून तसेच त्यांच्या वडिलांच्या नावावरून गंभीर आरोप करण्यात येत होते. त्या आरोपांना आज समीर वानखेडेंच्या वडिलांनी त्यांच्याकडील सर्व प्रकारची कागदपत्रे मा दाखवून प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावरच गंभीर प्रत्यारोप केले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांच्या वडिलांनी त्यांची जात आणि धर्म, नाव दर्शवणारे सर्व पुरावे समोर ठेवले. यामध्ये आधार कार्ड, मतदार यादीतील नावापासून, शाळेतील दाखले, नोकरीमधील कागदपत्रे आणि जमिनीची कागदपत्रे सादर केली. ते म्हणाले की, आम्ही एका दलिताचा हक्क हिरावल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आम्ही दलितच आहोत. मंडळी ही माझी कागदपत्रे आहेत त्यामध्ये जन्मल्यापासून, शाळा-कॉलेजमधील दाखले यांचा समावेश आहे. मी शेड्युल कास्ट महार जातीचा असून, मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. मी नोकरीला लागल्यापासून निवृत्त होईपर्यंत कधीही धर्म बदललेला नाही. पण मी एका मुस्लिम महिलेशी लग्न केलं हे सत्य आहे. १९७८ मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर समीरने किंवा मी कधीही इस्लामिक धर्मांतर केलेलं नाही. आज मी माझ्या दीडशे वर्षांतील वंशावळीचे पुरावे तुमच्यासमोर सादर करत आहे. मी मागासवर्गीय, आंबेडकरवादी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आज मंत्री रामदास आठवले येथे असल्याने माझ्या जातीचे लोक माझ्यामागे आहेत, याचा मला आनंद आहे, असे ते म्हणाले.
मी आज इथून नवाब मलिक यांना विनंती करतो की, त्यांनी आता आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नये. आता माझा मुलगा, मुलगी, पत्नी, बायको, नातू यांची नावं घेऊन, पहिलं लग्न, दुसरं लग्न असे आरोप करणे थांबवावे. आता प्रश्न आहे ड्रग्सचा. तर तुमच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात माझ्या मुलाने अटक केली, म्हणून तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात. मात्र तुम्ही जे काही आरोप करताय, त्याचे पुरावे कृपया तुम्ही न्यायालयात सादर करा, दाद मागा. मात्र आमची बदनामी करू नका, असे आव्हानही ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिले.
ज्ञानदेव वानखेडे कागदपत्रे दाखवून झाल्यावर म्हणाले की, मी कधीही धर्मांतर केलेलं नाही. आता मला मंत्रिमहोदयांना आवाहन करायचे आहे की, त्यांनी मंत्रिपदाची जी शपथ घेतली होती, त्याचे पालन कारावे. माझा असाही आरोप आहे की, नवाब मलिक हे बंगाली आहेत. ते मुंबईत कधी आले. त्यांचं गाव कुठलं. त्यांचं खरं नाव नवाब आहे का? एका बंगालीचं नाव नवाब कसं असू शकतं, याचीही चौकशी झाली पाहिजे. १०० रुपयांपासून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी उभी केली याची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच यापुढे जर नवाब मलिक यांनी माझ्या कुटुंबीयांवर काही वैयक्तिक आरोप केले तर मी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून कोर्टात जाईन, असा इशाराही ज्ञानदेव वानखेडे यांनी दिला.