षण्मुखानंदमध्ये साजरा होणार ‘मुंबई ड्रम डे २०२४’
By संजय घावरे | Published: February 2, 2024 07:43 PM2024-02-02T19:43:27+5:302024-02-02T19:43:34+5:30
उस्ताद झाकीर हुसेन, रणजीत बारोट, जीनो बँक्स, नितीन शंकर यांच्यासह दिग्गजांची रंगणार मैफिल
मुंबई- दरवर्षीप्रमाणे यंदाही 'मुंबई ड्रम डे'च्या माध्यमातून नाद-सुरांचा जागतिक उत्सव साजरा केला जाणार आहे. तंतुवाद्य तज्ज्ञ जीनो बँक्स संयोजित 'मुंबई ड्रम डे’मध्ये उस्ताद झाकीर हुसेन, रणजीत बारोट, जीनो बँक्स, नितीन शंकर यांच्यासह दिग्गज कलावंतांची सुमधूर मैफिल रंगणार आहे
तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली १० फेब्रुवारीला सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता 'मुंबई ड्रम डे' आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जगभरातील सर्वोत्तम कलाकार सहभागी होणार आहेत. संगीतातील विविध प्रकारांत पारंगत असलेले कलाकार एकाच व्यासपीठावर येणार असून, झाकीर हुसेन यांना जीनो बँक्स साथ देणार आहेत. बहुआयामी कलाकार रणजीत बारोट, चतुरस्त्र कलाकार नितीन शंकर आणि आघाडीचे तालवाद्य कलाकार विवेक राजगोपालन यांचाही या कार्यक्रमात सहभाग असेल. ‘मुंबई ड्रम डे २०२४’ची ही सहावी आवृत्ती आहे. यात वेंकिट आणि ताल इंक ऱ्हिदम इंसेम्ब्ल यांचा समावेश असून, आनंद भगत तसेच नितीन शंकर यांचा परक्यूशन फॅमिली सहभागी असेल.
त्यानंतर ता धोम प्रोजेक्ट अंतर्गत विवेक राजगोपालन यांचे वादन होणार आहे. बहुआयामी रणजीत बारोट हे नस्त्य सरस्वती यांच्यासोबत आपली कला सादर करणार आहेत. त्यांच्या जोडीला उस्ताद झाकीर हुसेन व जीनो बँक्स सहभागी होणार आहेत. ऱ्हिदम शॉ हे सुद्धा ‘मुंबई ड्रम डे २०२४’मध्ये सहभागी होणार आहेत. ‘मुंबई ड्रम डे २०२४’च्या निमित्ताने मुंबईकरांना अविस्मरणीय संगीत मेजवानीचा आनंद लुटता येणार आहे. मुंबई ड्रम डेच्या आयोजनाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र बांधणाऱ्या ताल शक्तीचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे जीनो बँक्स म्हणाले.