Join us

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत असून, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे, तर रुग्ण ...

मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत असून, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १८९ दिवसांवर आला आहे. शहर उपनगरात दिवसभरात २ हजार ३७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ६ लाख २९ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८ हजार ६४९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ६ ते १२ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३६ टक्का असल्याची नोंद आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३०,८८६ चाचण्या, तर आतापर्यंत ५८ लाख २६ हजार ७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ८५ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४३२ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २१ हजार ३३५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.