मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:14 AM2021-09-02T04:14:52+5:302021-09-02T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील काही आठवडे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र मागच्या ४-५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही आठवडे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे चित्र होते. मात्र मागच्या ४-५ दिवसांत शहर उपनगरातील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. मुंबईत दोन हजार दिवसांच्या पुढे गेलेला रुग्ण दुपटीचा काळ आता १ हजार ४७९ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या ३ हजार १८७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
शहर उपनगरात बुधवारी ४१६ रुग्णांची नोंद झाली असून, ४ मृत्यूची नोंद झाली आहे. ३२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४४ हजार ५७१ वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा १५ हजार ९८१ वर पोहोचला आहे. शहर उपनगरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख २२ हजार ९५० वर पोहोचली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. २५ ते ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०५% टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत चाळ आणि झोपडपट्टीच्या परिसरात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही. मात्र रुग्ण आढळून आल्याने ३२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज ४१ हजार ९२९ चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यंत एकूण ९२ लाख ८३ हजार ४९३ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.