मुंबई : मुंबईसारख्या शहरात उत्तुंग इमारती उभ्या करताना त्या भूकंपरोधक असाव्यात याकरिता नियमावली तयार केलेली आहे. मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. नेपाळमधील विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंपरोधक इमारतींची उभारणी अत्यावश्यक केली जाईल, अशा शब्दांत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विकासकांना खडसावले आहे. त्यामुळे आता नियमावलीचे पालन करावेच लागणार आहे.पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले की, मुंबई शहराला भूकंपाचा धोका असल्याची चर्चा सध्या सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. नेपाळमधून १८५ पर्यटक परतले असून, एकूण १६०० पर्यटक तेथे गेले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (विशेष प्रतिनिधी) राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टीका राज्य सरकारने शेतकऱ्यांना ११ हजार कोटी रुपयांची मदत दिली असून, ४ हजार कोटी रुपये खात्यात जमा केले आहेत. एवढी मदत यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने केलेली नाही. काँग्रेसने शेतकऱ्यांना अनुकूल नसलेली धोरणे आखली ज्याचा परिणाम शेतकरी आत्महत्या होण्यात झाला. त्यामुळे राहुल यांचा दौरा हा राजकीय स्टंट आहे, अशी टीका खडसे यांनी केली.पुनर्वसन : दुर्घटनाग्रस्त माळीण गावाचे पुनर्वसन करण्याचे काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. त्याकरिता सर्वांना २५० चौ.फू. क्षेत्रफळाची घरे देण्यात येणार आहेत. माळीणच्या शेजारची जागा उपलब्ध करून दिली जाईल. अशोक चव्हाण यांना टोला : राज्य सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेली टीका काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही खडसे यांनी लगावला.
मुंबईत इमारती भूकंपरोधकच हव्यात - एकनाथ खडसे
By admin | Published: April 29, 2015 2:00 AM