यांत्रिकी झाडूने पूर्व मुक्त मार्ग रोज होणार चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:16 AM2024-02-02T10:16:50+5:302024-02-02T10:18:14+5:30
पालिका दोन वर्षांकरता करणार सव्वातीन कोटी खर्च.
मुंबई : डीप क्लिनिंग अंतर्गत सर्व महत्त्वाच्या रस्त्यांची सफाई व धुलाई पालिकेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व मुक्त मार्ग आणि सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता (एससीएलआर) या रस्त्यांवर आठवड्यात दोनदा यांत्रिक झाडूने सफाई केली जात होती, तिथे आता दर दिवशी या यांत्रिक झाडूनेच सफाई केली जाणार आहे. त्यामुळे पूर्व मुक्त मार्ग यांत्रिकी चकाचक झाल्याचे पाहायला मिळणार आहे. या मार्गाची सफाई कायमस्वरूपी यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
पूर्व मुक्त मार्ग आणि सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता हा रहदारीचा असल्याने व दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात झालेल्या वाढीचा विचार करता या कामात नव्याने झालेल्या पुलांच्या साफसफाईच्या कामाची व्याप्ती लक्षात घेऊन सर्वच दिवस ही सफाई यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने या दोन्ही मार्गांची सफाई मनुष्यद्वारा न करता आठवड्यातील सातही दिवस यांत्रिक झाडूद्वारे करण्याचा निर्णय घेत यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे.
सध्या याशिवाय महानगरपालिकेचे नव्याने वापरात आलेले रस्ते व परिसर जसे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग या रस्त्यांची कंत्राटदारामार्फत यांत्रिकी झाडू यंत्राने साफसफाई केली जाते.
पूर्व मुक्त मार्गावर धूळमुक्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग :
धूळमुक्तीसाठीही विविध कामे करण्यात येत आहेत. साधारणपणे रस्ता पृष्ठीकरणासाठी डांबराचा ६ इंचाचा थर काढून त्यावर नवीन थर टाकला जातो. मात्र, ‘मायक्रो सर्फेसिंग’ या तंत्रज्ञानामध्ये डांबराचा रस्ता खराब होऊ नये, यासाठी सुमारे ६ ते ८ मिलिमीटरचे मजबूत आवरण केले जाते.
यात एका दिवसात सरासरी १ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे शक्य असते. डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन तासांमध्ये रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करता येते. पूर्व मुक्त मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ‘मायक्रो सर्फेसिंग’सह आवश्यक कामे करून घेण्यात आली आहेत.
कंत्राटदारांची निवड :
यांत्रिक झाडूद्वारे साफसफाई करण्यासाठी लक्ष्य एंटरप्रायझेस या कंपनीची निवड केली असून, या कंपनीवर पुढील दोन वर्षांकरता जबाबदारी सोपवली आहे. या दोन वर्षांकरता सव्वातीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी प्रतिदिन प्रति किलोमीटरसाठी ११०२ रुपये खर्च करण्यात आला होता, तर आता यासाठी पहिल्या वर्षी प्रतिदिन प्रति किलोमीटरसाठी १,२७४ रुपये म्हणजे १७० रुपये अधिक मोजले जाणार आहेत. तर दुसऱ्या वर्षी १,३२५ रुपये मोजले जाणार आहेत.