मुंबईः मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा गेल्या तासाभरापासून खंडित झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. लोकल सेवा, परीक्षांना मोठा फटका बसला आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. ऊर्जामंत्री कुठे आहेत, ते खुलासा करणार का, असे प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात येत आहेत. यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.'महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्कीट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. तो अवघ्या अर्धा-पाऊण तासांत पुन्हा सुरळीत होईल. आमचे विद्युत कर्मचारी तिथं युद्धपातळीवर काम करत आहेत. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल,' असं आश्वासन नितीन राऊत यांनी दिलं आहे.
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.