Join us

मुंबईत दोन दिवस मेघगर्जनेसह वीज कडाडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 6:23 AM

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, येथील हवामानातही उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत.

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, येथील हवामानातही उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाने विदर्भ तापत असतानाच, मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची अवेळी हजेरी लागत आहे. मुंबईकर तापदायक उन्हासह उकाड्याने कमालीचे हैराण झाले असून, उत्तरोत्तर हवामानात बदल होतच आहेत. याच बदलांमुळे मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: ढगाळ राहील आणि सायंकाळसह रात्री मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती.कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. गोव्यासह राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वारा, विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.>मुंबई ढगाळ : सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण ढगाळ नोंदविण्यात आले. सोमवारी सकाळी उपनगरावर मळभ दाटून आले होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत दाटून आलेले मळभ नंतर मात्र निवळले. परिणामी, पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले. दुपारी दोननंतर पुन्हा ढग दाटून आले. दरम्यान, सोमवारप्रमाणे मंगळवार, तसेच बुधवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरूच राहणार आहे.>मध्य महाराष्टÑात हवामान राहणार कोरडे१६ एप्रिल : विदर्भात काही ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१७-१८ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.१९ एप्रिल : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.

टॅग्स :पाऊस