मुंबईने साहित्याला समृद्ध केले: रवींद्र शोभणे
By स्नेहा मोरे | Published: December 3, 2023 06:04 PM2023-12-03T18:04:51+5:302023-12-03T18:07:54+5:30
अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विदर्भात जन्मलो असलो तरीही मुंबईने कायमच प्रेम दिले आहे. मुंबईतील साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यामुळेच महानगरी जाणिवा ठेवून अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेत लेखन केले आहे. मुंबई शहराने साहित्याला खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे, अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथे शुक्रवारी ४६ वे एकदिवसीय मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलन पार पडले. या प्रसंगी, ृसंमेलनाचे उद्घाटक म्हणून अभिनेता संजय मोने, स्वागताध्यक्षपदी वांद्रे पश्चिमचे आमदार ॲड. आशीष शेलार, साहित्य संघाचे अशोक बेंडखळे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनात शेलार यांच्या हस्ते अंमळनेर येथे भरणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी शोभणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आजपर्यंतचे लेखन वास्तववादी, खऱ्या गोष्टींशी नाते सांगणारे आहे. मला काल्पनिक लिहायला आवडत नाही किंवा जमत नाही’, असे प्रतिपादन ४६ व्या मुंबई महानगर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष वीणा गवाणकर यांनी केले. जे पुस्तक आपल्याला ग्रंथालयाच्या शेल्फवर हवे आहे असे वाटते आणि जर तसे पुस्तक नसेल तर ते आपण लिहावे, असे मला वाटते. विषय कधी कधी आपसूक आपला माग काढत येतात. आपण वाचू शकतो, लिहू शकतो आणि जर हे सांगू शकतो तर तुम्ही लिहू शकता, लिहित राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
भाषेसाठी आग्रही असले पाहिजे संजय मोने, अभिनेते , संमेलनाचे उद्घाटक
मराठी भाषा बोलताना मध्येच दोन-चार शब्द इंग्रजी बोलले जातात. आपण उच्चवर्णीय आहोत असे दाखवण्याची ही स्पर्धा सुरू झाली आहे. आपण आपल्या भाषेबद्दल आग्रही नाही. आपल्या मुलांना मराठी शाळेत घालत नाही. आपण आपली भाषा बोलत नाही. मराठी शाळा, मराठी भाषा वाचली पाहिजे याबाबत आपण आग्रही असले पाहिजे.
संत साहित्य संमेलन आयोजनाचा मानस आशिष शेलार, आमदार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष
वांद्रे ही कलेची भूमी आहे. वांद्रे परिसरात अनेक लेखक, कवी, विचारवंत हे वास्तव्याला आहेत. तसेच फिल्म सिटीतील अनेक अभिनेते या परिसरात राहतात. वांद्रे पूर्वेत कलानगर आणि साहित्य सहवास या परिसरात साहित्यिकांचा सदैव वावर राहिला आहे. त्यामुळे या परिसरात साहित्य संमेलनात सगळ्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. या साहित्य संमेलनासोबतच कधी तरी वांद्र्यातच संत साहित्य संमेलनही घ्यावे, असा मानस आहे.