मुंबई : इथिओपियन एअरलाइन्सच्या मुंबई ते इथोपिया सेवेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या विमान कंपनीने १९६६ मध्ये दिल्ली, तर १९७१ मध्ये मुंबईसाठी विमानसेवा सुरू केली होती. या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा मागोवा घेण्यासाठी मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इथिओपियन एअरलाइनच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी लेम्मा येडेचा म्हणाल्या की, येत्या काही काळात तीन ते पाच हवाई मार्गांची भर पडणार आहे. ब्रिक्स देशांत म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकात वाहतूक वाढविण्यावर आमचा भर असणार आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठी विमानसेवा असलेल्या इथिओपियन एअरलाइन्सला मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नई येथे दर आठवड्याला ३५ उड्डाणांची परवानगी आहे.
येत्या २ जुलैपासून आम्ही चेन्नईहून आठवड्यातून तीन उड्डाणे सुरू करणार आहोत. सध्याच्या एकल दैनंदिन ऑपरेशनच्या तुलनेत जूनच्या मध्यापासून मुंबई आणि दिल्लीला दररोज दोन उड्डाणे केली जातील, असेही त्यांनी सांगितले. भारतातील सुमारे ६५-७० टक्के प्रवासी आदिस अबाबाहून आफ्रिकेतील इतर ठिकाणी प्रवास करतात. ब्रिक्स देशातील हवाई वाहतुकीवर आमचे लक्ष आहे. आम्ही भारत आणि दक्षिण आफ्रिका/ब्राझील आणि चीन आणि लॅटिन अमेरिका दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक करत आहोत. रशियाहून आफ्रिकेकडे वाहतूकही केली जाते. विशेष म्हणजे युद्धानंतरही रशियाकडून होणारी वाहतूक कमी झाली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
इथोपिया एक सुंदर देश आहे. ५० वर्षाच्या काळात कित्येवेळा इथोपियाला भेट दिली. एकाच घरात राहणारे तीन भाऊ तीन वेगळ्या धर्माचे पालन करतात. येथील सामाजिक सलोखा विशेष भावणारा आहे. - सुभाष गोयल, अध्यक्ष स्टिक ट्रॅव्हल ग्रुप