मुंबई : महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागातील मानखुर्द – मंडाळा या खाडीलगत असलेल्या भूभागावर भंगार मालाची ६३ अनधिकृत गोदामे उद्भवली होती. हे सर्व अनधिकृत गोदामे महापालिकेच्या 'एम पूर्व'विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या धडक कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत. शिवाय,येथील ६ आस्थापनांवर पोलीसात गुन्हे(FIR) नोंदविण्यात आले असून, १९ आस्थापनांचे पाणी व वीजेची जोडणी खंडित करण्यात आली आहे, अशी माहिती एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे. या कारवाईमुळे या भागातील भंगार मालाला आग लागण्याचे प्रकार नियंत्रणात आणण्यास मदत होईल, अशीही माहिती किलजे यांनी दिली.
महापालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार'एम पूर्व' विभागाद्वारे नुकत्याच करण्यात आलेल्या या कारवाईत महापालिकेच्या'एम पूर्व' विभागाचे ५० कामगार – कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते.तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे १७ पोलीस कर्मचारी - अधिकारी यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या कारवाईसाठी ५जेसीबी, ६ डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री वापरण्यात आली,अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.