मुंबईने श्रावणात अनुभवले पावसाचे तांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:53 AM2020-08-07T05:53:45+5:302020-08-07T05:54:09+5:30

शॉक लागून दोघांचा मृत्यू; ३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ क्रमांकावर मदतीसाठी ३ हजार कॉल

Mumbai experienced rain ordeal in Shravan | मुंबईने श्रावणात अनुभवले पावसाचे तांडव

मुंबईने श्रावणात अनुभवले पावसाचे तांडव

Next

मुंबई : संततधार पावसामुळे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबई शहरात २७४, पूर्व उपनगरात ४० आणि पश्चिम उपनगरात ४७ अशा प्रकारे तब्बल ३६१ ठिकाणी झाडे कोसळली. तर शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे एरवी उन-पावसाचा खेळ पाहायला मिळणाऱ्या श्रावणात मुंबईकरांना पावसाचे तांडव पाहायला मिळाले.

कुर्ला येथील हॉल व्हिलेज लगतच्या ग्लीप परेरा चाळीवर झाड पडले. यात जखमी झालेल्या केन डिसुजा यांना कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान १९१६ या क्रमांकावर मदतीसाठी ३,२०२ दूरध्वनी आले. ३६१ ठिकाणी झाडे कोसळल्यानंतर शॉटसर्किट झाले. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वीजपुरवठा खंडित केला होता. ५७ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. दहिसरमध्ये बुधवारी सकाळी माईल स्टोन सोसायटी परिसरात शॉक लागून शंभु सोनी (३८) यांचा मृत्यू झाला. तर मशीद बंदर येथे गुरुवारी पहाटे रेल्वे कर्मचारी संजीव (३२) यांचाही शॉक लागून मृत्यू झाला.

उच्च न्यायालयाचे कामकाज दुसऱ्यांदा ठप्प
मुंबई : पावसाचा जोर कायम असल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज गुरुवारी ठप्प झाले. मंगळवारीही शहरात व उपनगरांत मुसळधार पाऊस पडल्याने न्यायालयाचे कर्मचारी कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत. गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने कर्मचाºयांना कामावर पोहचणे शक्य नसल्याने न्यायालयाने कामकाज तहकूब केले.

केम्प्स कॉर्नर परिसरातील उतारावरील भाग खचला 

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार सरी कोसळत असतानाच बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बाबुलनाथ जंक्शन नजीकच्या केम्प्स कॉर्नर परिसरातील उतारावरील भाग खचला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेने बुधवारी रात्रीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून कोसळलेला भाग आणि उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम वेगाने हाती घेतले. त्यासाठी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली. सद्य:स्थितीत दोन लेनचा रस्ता खचला असून लगतच्या इमारतींना धोका पोहोचू नये तसेच हे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काही काळ हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई महापालिचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती समजून घेतली. आयुक्तांव्यतिरिक्त महापौर किशोरी पेडणेकर यांनीही खासदार अरविंद सावंत यांच्यासमवेत दुर्घटनास्थळाची पाहणी केली. येथील बी जी. खैर मार्ग, पाटकर रस्त्यालगत असलेली संरक्षक भिंतही अतिजोरदार पावसामुळे एन. एस. पाटकर मार्गावर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळली. महापौर म्हणाल्या की, संरक्षक भिंतीच्या वरच्या भागात तीनशे ते चारशे मिमी व्यासाच्या पाण्याच्या मोठ्या चार लाईन्स आहेत. दगडाचा पाया असलेली, दगडात बांधलेली ही भिंत होती. डोंगरावरून धबधब्यासारखे कोसळणाºया पाण्याच्या प्रवाहामुळे ती खचली. पालिकेने रात्रीच सर्व यंत्रणा कार्यान्वित करून काम हाती घेतल्याने येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

३० पाण्याचे टँकर पाठविले
केम्प्स कॉर्नर येथे डोंगराचा काही भाग कोसळल्यानंतर येथील पाण्याचे वॉल्व्ह खराब झाले. येथे दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, हिल रोड, फोर्जेस स्ट्रीट, राघवजी रोड, डमाडिया कॉलनी, आॅगस्ट क्रांती मैदान, अल्टा माऊंट रोड, साफिया पारेख लेन, पेडर रोड, एन एफ पारकर रोड या परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. येथे जवळपास ३० पाण्याचे टँकर पाठविले. यापैकी २२ पाण्याचे टँकर वापरण्यात आले.

असा बरसला
च्सकाळी ५.३० वाजता : सांताक्रुझ येथे १४६.१ तर कुलाबा येथे ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याच काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने हिंदमाता येथे साचलेले पाणी पूर्णत: ओसरले. परिणामी रस्ते वाहतूक सुरळीत झाली. मुंबई सेंट्रल परिसरातील नवजीवन परिसरात साचलेले पाणी ओसरल्याने रस्ते वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती महापालिकेने दिली.
च्सकाळी ७ वाजेपर्यंत : शेख मिस्त्री दर्गा, बीपीटी कॉलनी स्कायवॉक, खेतवाडी, सक्कर पंचायत, महर्षी कर्वे रोड, नायर रुग्णालय परिसर, सी.पी. टँक, मशीद बंदर, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, गोवंडी येथील प्रगती निवास येथे पावसामुळे पाणी साचले होते. पाण्याचा उपसा करण्यासाठी ठिकठिकाणी ५१ पंपिंग कार्यरत होते. सर्व सबवेच्या ठिकाणी पपिंग वेगाने कार्यरत होते. शहरात ५ ठिकाणी झाडे कोसळली. हार्बर, मध्य रेल्वे सुरू झाली नव्हती. पश्चिम रेल्वे साधारण वेगात धावत होती. गांधी मार्केट, शेल कॉलनी, मुंबई सेंट्रल, गोल देऊळ, नायर रोड, संत रोहिदास चौक येथे बेस्टची वाहतूक वळविण्यात आली.
 

Web Title: Mumbai experienced rain ordeal in Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.