मुंबई : स्वस्तात घर घेण्याच्या नादात कुटुंब रस्त्यावर; फ्लॅटसाठी एनआरआयने गमावले ८ किलो सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:33 AM2018-01-24T02:33:32+5:302018-01-24T02:34:17+5:30
उच्चभ्रू वसाहतीत स्वस्तात घर घेण्याच्या नादात एक कुटुंब रस्त्यावर आले आहे, तर अमेरिकेतील एनआरआयने वडिलोपार्जित ८ किलो सोने गमावल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली.
मनिषा म्हात्रे
मुंबई : उच्चभ्रू वसाहतीत स्वस्तात घर घेण्याच्या नादात एक कुटुंब रस्त्यावर आले आहे, तर अमेरिकेतील एनआरआयने वडिलोपार्जित ८ किलो सोने गमावल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली. विनम्र डेव्हलपर्सच्या संचालकासह त्याच्या पत्नी आणि अन्य दोघांविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी या प्रतापी पती-पत्नीने एकच फ्लॅट तीन जणांना विकण्याचाही घाट घातला होता.
अमेरिकेतील रहिवासी असलेले सफीर सुलेमान सय्यद यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. सांताक्रुझ परिसरात त्यांचे घर आहे. मुंबईत उच्चभ्रू वसाहतीत घर घेण्यासाठी त्यांचा शोध सुरू होता. याच दरम्यान त्यांची ओळख विनम्र डेव्हलपर्सच्या हर्षद सोनीसोबत झाली. त्याच्या ओळखीने त्यांनी सांताक्रुझ येथे सुरू असलेल्या शांती गोल्ड इमारतीत २ फ्लॅट घेण्याचा व्यवहार ठरविला. सय्यद हे अमेरिकेत असल्याने त्यांनी अंधेरीतील मित्र सत्तार मोदी (३६) सोबत संपर्क साधत या व्यवहाराबाबत सांगितले. त्यांच्या मुंबईतील
घरातील दागिने सोनीला देण्यास सांगितले.
सय्यद यांच्या सांगण्यावरून ३१ मार्च २०१५ रोजी मोदी यांनी त्यांचे घर गाठले. तेथे एका बॅगेतून वडिलोपार्जित दागिने काढून दिले, तेव्हा सोनी वजन काटा घेऊन तेथेच हजर झाला. तेव्हा जवळपास ८ किलोपेक्षा जास्त सोने आढळून आले. या वेळी हर्षदची पत्नी गीता, नातेवाईक अमरिश सोनी आणि चेतन ढाकनही तेथे हजर झाला. मोदीने ते सोने सोनीकडे दिले. त्याने दोन दिवसांत कागदपत्रे सय्यदला मेल करतो, असे सांगितले. दोन फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर त्यांना मेल केले.
मात्र, काही दिवसांनी कागदपत्रांच्या नोंदणीसाठी सोनीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. सय्यद यांचे फोनही उचलण्यास बंद केल्याने त्याच्यावर संशय आला. यामध्ये फसवणूक झाल्याचे समजताच, त्यांनी सय्यद यांच्या वतीने मोदी यांनी रविवारी अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी हर्षद सोनीसह पत्नी गीता सोनी, अमरिश सोनी आणि चेतन ढाकण विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
...आणि कुटुंब रस्त्यावर आले-
कांदिवली पश्चिमेकडील रहिवासी असलेले उदय सालियन (४२) हे टॅक्स कन्सल्टंट आहेत. २०१२ मध्ये त्यांची ओळख हर्षद सोनीसोबत झाली. तेव्हा सोनीने शांती गोल्ड इमारतीत ७५० स्क्वेअर फुटांचा फ्लॅट कमी किमतीत देण्याचे आमिष दाखविले.
मोठ्या घराच्या स्वप्नात सालियन यांनी त्यांचे घर विकले. गेल्या दोन महिन्यांपासून अंधेरीत भाड्याच्या घरात राहत आहे. घर विकून आलेल्या २७ लाखांच्या रकमेसह मित्र, नातेवाइकांकडून कर्ज घेत, त्यांनी तीन वर्षांत २ कोटी ९३ लाख रुपये सोनीला दिले. मात्र, सोनीने पैसे घेऊन घराचा ताबा दिला नाही. या प्रकरणी सालियन यांच्या तक्रारीवरून ५ जानेवारी रोजी सोनीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
बीकेसीमध्येही तक्रार-
सोनी पतिपत्नीविरुद्ध अंबोली पोलीस ठाण्यात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत, शिवाय बीकेसी पोलीस ठाण्यातही एक तक्रार अर्ज गेला आहे. कमी किमतीत उच्चभ्रू वसाहतीत फ्लट देण्याचे आमिष दाखवून, त्यांनी कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
हर्षद सोनीसह पत्नी गीता सोनी, अमरिश सोनी आणि चेतन ढाकण विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.