मुंबई- सेलिब्रेटी व चाहते यांच्यामध्ये अनोख नातं असतं. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कलाकाराच्या घराबाहेर तासनतास उभे राहिलेले पाहायला मिळतात. आवडत्या कलाकारासाठी काय करतील, याचा अंदाजही बांधणं कठीण आहे. अशीच एक घटना अभिनेता संजय दत्तच्या बाबतीत घडली आहे. अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने तिची संपूर्ण संपत्ती संजय दत्तच्या नावे केली आहे. 62 वर्षीय निशी त्रिपाठी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या सेफ डिपॉझिटमधील रक्कम संजय दत्तच्या नावे केली. 'मुंबई मिरर'ने हे वृत्त दिलं आहे.
अभिनेता संजय दत्तने मुंबईतील 'बँक ऑफ बडोदा'च्या वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून ही रक्कम त्रिपाठी कुटुंबाला परत करण्याची विनंती केली आहे. निशी त्रिपाठी कोण आहेत? याची थोडी कल्पनाही संजय दत्तला नव्हती. 29 जानेवारी 2018 रोजी पोलिसांनी संजयला फोन केला. '15 दिवसांपूर्वी निशी यांचं निधन झालं असून त्यांनी आपल्या बँक खात्यातील रक्कम आणि बँक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केला आहे.' असं पोलिसांनी संजय दत्तला त्यावेळी सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, निशी या संजय दत्तच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहेत, हे त्रिपाठी कुटुंबालाही त्यांच्या मृत्यूनंतरच समजलं. निशी यांनी बँकेला लिहिलेली पत्रं समोर आल्यावर त्रिपाठी कुटुंबालाही धक्का बसला. कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्यामुळे निशी त्रिपाठी यांचं लॉकर अजून उघडण्यात आलेलं नाही. पण, निशी यांचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, ती संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाच मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून सांगितलं आहे.
निशी त्रिपाठी या गृहिणीचं आजाराने 15 जानेवारी रोजी निधन झालं. 80 वर्षीय आई शांती आणि अरुण, आशिष, मधू या भावंडांसोबत त्या राहत होत्या. मलबार हिलमधील त्रिवेणी अपार्टमेंटमधल्या थ्री बीएचके फ्लॅटमध्ये त्रिपाठी कुटुंब राहतं. हा फ्लॅट जवळपास अडीच हजार चौरस फूटांचा असून त्यांची बाजारभावानुसार किंमत 10 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.