मुंबईच्या शेतकऱ्यांना ठेंगा, नुकसान भरपाई मिळेना; ठाण्यातही तशीच स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:32 PM2023-12-05T14:32:20+5:302023-12-05T14:35:58+5:30
तेही शेती करतात, पण सरकारच्या लेखी ते शेतकरी नाहीत. त्यांच्याकडे सातबारा आहे, पण शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही.
मुंबई :
तेही शेती करतात, पण सरकारच्या लेखी ते शेतकरी नाहीत. त्यांच्याकडे सातबारा आहे, पण शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. ते गावखेड्यातील शेतकरी नाहीत, तर ते आहेत मुंबईच्या वेशीवर काळ्या मातीत घाम गाळणारे शेतकरी! पण, त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या धर्तीवर कोणतेही लाभ मिळत नाहीत. नुकसान भरपाई मिळत नाहीत. गोराई, मनोरी, मार्वे भागातील शहरी बळीराजाची ही व्यथा!
मुंबई, ठाण्यातही शेती
मुंबईच्या बोरिवली भागात, मार्वे, मनोरी, गोराई, ठाण्यात उत्तन, घोडबंदर, वसई या भागात फार पूर्वीपासून शेती केली जाते. ऋतुमानानुसार पीक घेतले जाते. यात प्रामुख्याने भातशेती होते. त्याशिवाय केळी, पपई, टोमॅटो, फणस, आंबा अशी फळझाडेही अनेकांनी लावली आहेत. त्यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. मुंबईच्या तसेच स्थानिक बाजारात या फळांची विक्री होते. भाजीही मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते.
निसर्गाचा त्यांनाही फटका
अवकाळी पाऊस, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फटका या भागातील शेतकऱ्यांनाही बसतो.
अशा प्रकरे नुकसान झाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सरकारकडून मदत मिळते.
पंचनामे होतात. पण, मुंबईतील शेतकऱ्याला यापैकी काहीही लाभ मिळत नाहीत.
नुकसान झाल्यास ते सहन करायचे एवढेच त्यांच्या हातात असते. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र मदत मिळते.
शेतकरी दाखला मिळविण्यासाठीही शंभर खेटे
स्वीटसी हेनरिक यांच्या सासू गोराईत शेती करतात. शेतकरी दाखला मिळावा म्हणून हेनरिक यांनी असंख्य वेळा तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवले. त्यानंतर कुठे त्यांना दाखला मिळाला. मात्र, मुंबईत शेतकरी दाखला असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा - योजना आमच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत नाहीत, असे या कार्यालयाकडून लेखी देण्यात आले, असे हेनरिक यांनी सांगितले.