मुंबईतून फतेहपूरला नेऊन खून
By admin | Published: February 3, 2016 02:42 AM2016-02-03T02:42:36+5:302016-02-03T02:42:36+5:30
घाटकोपरमधील एका महिलेला उत्तर प्रदेशातील दुर्गम गावात नेऊन तिची हत्या करून दागिने लुबाडणाऱ्या मारेकऱ्याला पकडण्यात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-४ च्या पथकाला यश आले आहे
मुंबई : घाटकोपरमधील एका महिलेला उत्तर प्रदेशातील दुर्गम गावात नेऊन तिची हत्या करून दागिने लुबाडणाऱ्या मारेकऱ्याला पकडण्यात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-४ च्या पथकाला यश आले आहे. नसीम सुलेमान खान (३६, रा. लैलोनी, जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सबिना ऊर्फ सब्बो कौसर खान (२८, रा. नारायणनगर, घाटकोपर) या महिलेची त्याने हत्या केली आहे. खान हा उत्तर प्रदेशातील कॉँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याने स्थानिक लैलोनी ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील लढवली होती, असे पोलिसांनी सांगितले.
घाटकोपरला राहत असलेली सबिना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बेपत्ता होती. सबिनाच्या कुटुंबीयांनी १५ जानेवारीला घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परिचयातील नसीम खानने तिला नेल्याचा संशय होता. तो मंगळवारी सायन रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती युनिट-४ मधील कॉन्स्टेबल गंगाधर पिलवटे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचला. पथकाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ब्लँकेटमध्ये लपविलेल्या दोन बॉक्समध्ये सोन्याचे दागिने सापडले. चौकशीत त्याने नसीम खान नाव सांगून सबिनाच्या खुनाची कबुली दिली. ३० जानेवारीला त्याने साथीदाराच्या मदतीने लैलोनी गावात तिची गळा चिरून हत्या केली. मुंडके धडापासून वेगळे करत गावातील एका तलावात फेकून दिले. तर धड एका गोणीत भरून गावाच्या दुसऱ्या टोकावर नेऊन फेकले. दुसऱ्या दिवशी गावातील लहान मुलांना खेळताना ही गोणी आढळली होती. याबाबत पोलीस ठाण्यात नसीम खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. त्याचा ताबा फतेहपूर पोलिसांना देणार असल्याचे सांगण्यात आले. )