सुधारणा करा, आठशेंवर हाॅटेल्सना नोटिसा; ३० रेस्टाॅरंटचे ‘शटर’ डाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:05 AM2024-01-11T10:05:53+5:302024-01-11T10:06:56+5:30
वर्षभरात कारवाईत एकूण १३ लाखांहून अधिक दंड वसुली.
मुंबई : मागील काही वर्षांत ऑनलाइन फूड आणि वाढलेल्या हाॅटेलिंगच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षात राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरातील हाॅटेल्सवर तपासणी मोहीम राबविली. यासाठी हाती घेतलेल्या या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरातील तब्बल ८०३ हाॅटेल्सला सुधारणा नोटिसा पाठविल्या आहेत. तर आतापर्यंत ३० हाॅटेल्सचे शटर डाऊन केले आहे.
वर्षभर राबविण्यात आलेल्या या कारवायांतून अन्न व औषध प्रशासनाने १३ लाख ९५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील वर्षात विविध हाॅटेल्समध्येही स्वच्छतेचे नियम, कचराकुंड्या, खाद्यपदार्थांची साठवणूक, भेसळयुक्त पदार्थ अशा विविध निकषांवर ही तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.
राज्याची आकडेवारी :
अन्नसुरक्षा अधिकारी १२५
तपासणी संख्या १,४३२
अन्न नमुने संख्या ४२३
सुधारणा नोटीस ८०३
परवाना निलंबन २८
व्यवसाय बंद नोटीस ३०
दंड शुल्क वसुली १३,९५,१००
न्यायप्रविष्ट प्रकरणे २२
२८ जणांचे परवाने निलंबित :
राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या १२५ अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी १४३२ हाॅटेल्सची तपासणी करत ही मोहीम राबविली आहे.
या मोहिमेत आतापर्यंत २८ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एकूण २२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, अशी माहिती एफडीएने दिली आहे.
त्याचप्रमाणे, पंचतारांकित हाॅटेल्ससह रस्तोरस्ती, गल्लोगल्ली वाढत असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांवरही एफडीएची टीम तपासणी करणार आहे. मात्र ग्राहकांनीही दक्षता राखून अन्नसुरक्षेविषयी जागरूक राहून प्रशासनाकडे तक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.