२९, ३०, ३१ ऑगस्टला भरतीमुळे मुंबापुरीची तुंबापुरी होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:02 AM2019-08-21T02:02:35+5:302019-08-21T02:02:54+5:30
२१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून वेगाने सक्रिय झाला तर २९, ३०, ३१ आॅगस्ट रोजी पुन्हा मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. कारण या तिन्ही दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत समुद्राला मोठी भरती असून, या काळात ४.९० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
भरतीच्या जोडीला मान्सून वेगाने कोसळला तर पाणी तुंबण्याची समस्या उद्भवेल. मात्र, हवामान खात्याने अद्याप या आठवड्यातील अंदाज वर्तविलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना तूर्तास तरी दिलासा आहे.
२१ आॅगस्ट रोजी कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. २२ आॅगस्टला कोकण, गोव्यात बºयाच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २३, २४ आॅगस्टला कोकण, गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मुंबईत २१, २२ आॅगस्टला शहर, उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
मराठवाड्याचा पारा चढला
राज्यभरात पावसाचा जोर ओसरला असून बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. सोलापूर, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यांच्या कमाल तापमान वाढत आहे. आठवडाभर हीच स्थिती राहील. दरम्यान उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि मध्य भागात, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भाचा काही भाग, मराठवाडा, कर्नाटकाच्या काही भागात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र
२२ आॅगस्टदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, २२ ते २४ आॅगस्टदरम्यान छत्तीसगड, विदर्भ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये १०० मिलीमीटर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण आणि केरळ किनारीही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.