ढगाळ वातावरणामुळे भरली मुंबईकरांना धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:31 AM2019-07-11T06:31:49+5:302019-07-11T06:31:56+5:30

घाटकोपरमध्ये शॉक लागून महिलेचा मृत्यू; सायनमध्ये दरड कोसळून एक जखमी

mumbai in fear when cloudy atmosphere in sky | ढगाळ वातावरणामुळे भरली मुंबईकरांना धडकी

ढगाळ वातावरणामुळे भरली मुंबईकरांना धडकी

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सकाळसह दुपारी १२ वाजेपर्यंत ऊन पडले होते. त्यानंतर मात्र दाटून आलेल्या ढगांमुळे मुंबईकरांना धडकी भरली. दुपारी पावसाचा जोर वाढला. विशेषत: मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरात दाटून आलेल्या ढगांनी पावसाचा जोरदार मारा सुरू केल्याने काही क्षण का होईना मुंबईकरांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पडलेल्या या पावसाने नंतर विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.


दरम्यान, मान्सून पडझड सुरूच असून घाटकोपर पश्चिमेकडील वसंत नाईक मार्गावरील पंचशील बुद्ध विहार येथे मंगळवारी दुपारी ३ वाजता एका घरात इलेक्ट्रिकचा शॉक लागून रत्ना सुनील कांबळे (२८) या महिलेचा मृत्यू झाला.
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडील नोंदीनुसार, शहरात २, पूर्व उपनगरात ९ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात ३, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण ११ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात ४, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.


सायन कोळीवाड्यात कोसळली दरड
सायन कोळीवाडा येथे सल्लामुद्दीन झोपडपट्टीवर बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत शैलम्मा देवेंद्र यांच्या पायाला दुखापत झाली असून, सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज कोकणात मुसळधार
११ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महराष्ट्र आणि गोव्याचा समुद्र खवळलेला राहील.
१२ ते १४ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसाठी अंदाज
११ व १२ जुलै :
मुंबई शहर-उपनगरात थांबून थांंबून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतील
पाऊस (मिमी)
कुलाबा ६०.२
सांताक्रुझ ३२.८

घाटकोपर पश्चिमेकडील माणिकलाल मेहता मार्गावर दुपारी झाड कोसळले. यात लक्ष्मीकांत सिंग जखमी झाले. त्यांच्यावर येथील हिंदुसभा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: mumbai in fear when cloudy atmosphere in sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.