जानेवारीत रंगणार मुंबई महोत्सव; सरकारचा निर्णय, आनंद महिंद्रांवर सोपवली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 05:59 AM2023-09-22T05:59:28+5:302023-09-22T06:00:07+5:30

फाउंडेशनची स्थापना, मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व नवीन ओळख देण्यासाठी मुंबई महोत्सवाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai festival to be held in January; Govt's decision, Anand Mahindra is entrusted with the responsibility | जानेवारीत रंगणार मुंबई महोत्सव; सरकारचा निर्णय, आनंद महिंद्रांवर सोपवली जबाबदारी

जानेवारीत रंगणार मुंबई महोत्सव; सरकारचा निर्णय, आनंद महिंद्रांवर सोपवली जबाबदारी

googlenewsNext

मुंबई - राज्यातील पर्यटनाला चालना देऊन मुंबई शहराला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी दुबई व न्यूयॉर्क फेस्टिव्हलच्या धर्तीवर दरवर्षी जानेवारी महिन्याचा तिसरा शनिवार ते चौथा रविवार अशा एकूण ९ दिवसांच्या कालावधीत ‘मुंबई महोत्सवा’चे मुंबई शहर व उपनगरातील विविध भागांत आयोजन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महोत्सवाच्या आयोजनात सातत्य राखण्यासाठी मुंबई महोत्सव फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून, आनंद महिंद्रा हे या फाउंडेशनचे अध्यक्ष असतील. 

मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असून, प्रमुख व्यापारी केंद्र आहे. देश-विदेशातील लोकांमध्ये मुंबई शहराबद्दल तसेच इथल्या बॉलिवूड, नाइटलाइफ, शॉपिंग, बीच टूरिझम, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा इ.बद्दल विशेष आकर्षण आहे. मुंबई शहरास दररोज हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक / व्यावसायिक भेटी देत असतात. या पार्श्वभूमीवर मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी व नवीन ओळख देण्यासाठी मुंबई महोत्सवाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या फाउंडेशनला दरवर्षी २५ कोटी इतका निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३ वर्षांसाठी परवानगी कायम राहणार
पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बृहन्मुंबई पर्यटन विकास प्रकल्पासाठी समन्वय व संनियंत्रण समिती, हीच मुंबई महोत्सवाकरिता कार्यकारी समिती म्हणून काम पाहील. मुंबई महोत्सवासाठी एकदा प्राप्त झालेल्या परवानग्या पुढील तीन वर्षांसाठी कायम राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

फाउंडेशनमध्ये कोण?
राज्याचे मुख्य सचिव हे आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखालील फाउंडेशनचे सहअध्यक्ष असतील. महापालिका आयुक्तांसह पोलिस आयुक्त, भारतरत्न सचिन तेंडुलकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अमिताभ चौधरी, ड्रीम ११चे हर्ष जैन, चित्रपट क्षेत्रातील रॉनी स्क्रूवाला, टाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा, प्रयत्न संचालनालयाचे संचालक, एम पॉवरमाइंडच्या नीरजा बिर्ला आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे हे संचालकपदी कार्यरत असतील.

Web Title: Mumbai festival to be held in January; Govt's decision, Anand Mahindra is entrusted with the responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.