मुंबई फिल्मसिटीचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:40+5:302021-07-02T04:06:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच मुंबई फिल्मसिटीचा आता कायापालट होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच मुंबई फिल्मसिटीचा आता कायापालट होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने फिल्मसिटीमधील २२ एकर जागेवर पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये ८० स्टुडिओसह इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे फिल्म, मीडिया, एंटरटेनमेंट क्षेत्रातील अनुभवी विकासकर्त्यांना एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टचे आमंत्रण देण्यात आले आहे.
याआधीदेखील अशा प्रकारची योजना सरकारच्यावतीने करण्यात आली होती मात्र तिचा विस्तार जास्त असल्याने त्यावेळी कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. मात्र यावेळी विकासकर्त्यांनी येथे रुची दाखवावी यासाठी पूर्वीच्या तुलनेत कमी जागेवर पायाभूत सुविधा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
१९७७ साली फिल्मसिटीची स्थापना झाली. त्यात एकूण १६ इनडोअर स्टुडिओ आहेत. अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकवर्ग वाढल्याने इनडोर व आउटडोअर स्टुडिओची मागणी वाढली आहे. सिनेसृष्टीत काम करणारे बहुतेक कलाकार मुंबईत राहतात.
अशावेळी सिनेमा व मालिका बनविताना कलाकार व इतर कर्मचाऱ्यांना सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी या जागेवर ८० स्टुडिओ बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. यात स्टुडिओ फ्लोअर्स, आउटडोर लोकेशन्स, पोस्ट प्रोडक्शन यांसारख्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. मुंबई फिल्मसिटीतील ४० टक्के जागेचाच विकास केला जाऊ शकतो. त्यामध्ये सुरुवातीला २२ एकर जागेवर विकासकार्य करण्यात येणार आहे. यानंतर उर्वरित जागेचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे.