Mumbai News: मुंबईत पुन्हा एक आगीची दुर्घटना घडली. मस्जिद बंदरमधील इस्साजी मार्गावर असलेल्या एका बहुमजली इमारतीत आग लागली. ११ मजली पन्ना मॅन्शन इमारतीच्या तळ मजल्यावर आगीचा भडका उडाला. या घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे श्वास कोंडल्याने दोन महिलाचा मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१६ फेब्रवारी) पहाटे ही घटना घडली. सकाळी सव्वा सहा वाजता अग्निशामक दलाला याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. काही वेळात आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पन्ना मॅन्शनमध्ये लागलेली आग तळ मजल्यावरील कॉमन मीटर बॉक्स आणि पॅसेजमधील विद्युत तारांपर्यंत मर्यादित होती. पण, आगीमुळे इमारतीमध्ये धूर झाला होता. दोन महिला बेशुद्धावस्थेत मदत आणि बचाव कार्य हाती घेतल्यानंतर जवानांना बेशुद्धावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. महिलांचे हात आणि पाय होरपळलेले होते आणि धुरामुळे गुदरमल्याने त्या पडल्या होत्या. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्याचबरोबर सहाव्या मजल्यावर एक व्यक्ती, तर आठव्या मजल्यावर एक महिला धुरामुळे गुदरमरून पडले होते. त्यांनाही जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
साजिया आलम शेख (वय ३०) आणि सबिला खातून शेख (वय ४२) यांचा आगीत होरपळल्याने आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे जेजे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. याज्ञिक यांनी सांगितले.
शाहीन शेख (वय २२) आणि खरीम शेख (वय २०) अशी घटनेत जखमी झालेल्या इतर दोघांची नावे आहेत. घटनेतील तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.