सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

By सीमा महांगडे | Published: November 18, 2023 12:01 PM2023-11-18T12:01:28+5:302023-11-18T12:05:12+5:30

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी नवीन साहसी कामगिरीची नोंद कली आहे. 

mumbai fire brigade jawan solo cycling completes the journey from kashmir to kanyakumari | सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान योगेश प्रकाश बडगुजर यांनी वैयक्तिकरीत्या (सोलो) सायकलिंगद्वारे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. गत वर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांनी युरोपातील सर्वोच्च पर्वत शिखर माऊंट एल्ब्रसवर तिरंगी झेंडा फडकावला होता. आता काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी नवीन साहसी कामगिरीची नोंद कली आहे. 

मुंबई अग्निशमन दलातील नियंत्रण कक्षात योगेश प्रकाश बडगुजर हे अग्निशमन जवान म्हणून कार्यरत आहेत. ते सन २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेत रुजू झाले. तेव्हापासून शारीरिक व मानसिक क्षमता जोपासण्यासाठी ते गिर्यारोहण आणि सायकलिंग करतात. याच आवडीतून त्यांनी आतापर्यंत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो, रशियामधील नैऋत्येकडे असलेले माऊंट एल्ब्रस सर केले आहे. त्यापुढे जावून त्यांनी सायकलिंगद्वारे वेगळी वाट निवडून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास पूर्ण पल्ला केला आहे. योगेश यांनी २६ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीनगरमधील लाल चौकातून सायकलिंगला सुरुवात केली. त्यानंतर १४ दिवस, १२ तास आणि ३० मिनिटांत म्हणजेच ९ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांनी कन्याकुमारी गाठले. या कालावधीत त्यांनी ३ हजार ६१७ किलोमीटर अंतर सायकलने कापले. 

काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि तितकाच साहसीदेखील होता. या प्रवासात सांस्कृतिक सामाजिक परंपरा, निरनिराळे प्रांत, त्यांची भाषा, जीवनशैली अनुभवता आली. प्रत्येक प्रांतातील नागरिकांशी थेट संवाद साधता आला. यातून आपल्या भारत देशाचे वैविध्य आणि रुढी-परंपरांची ओळख झाली, असे बडगुजर यांनी सांगितले.

जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर / २९,०३१ फूट उंच) सर करण्याचे उद्दिष्टदेखील त्यांनी ठेवले आहे. अशा कामगिरीतून बृहन्मुंबई महानगरपालिकेचा, मुंबई अग्निशमन दलाचा नावलौकिक सातही खंडात झळकावण्याचा त्यांचा मानस आहे. बडगुजर यांच्या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, आश्विनी भिडे, सह आयुक्त रमेश पवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आदींनी अभिनंदन केले.

Web Title: mumbai fire brigade jawan solo cycling completes the journey from kashmir to kanyakumari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.