१ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 12:01 AM2018-01-25T00:01:57+5:302018-01-25T00:02:26+5:30
मुंबई - आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास येत्या १ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनावर जाण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामाचे तास, कामावरील तणावाची परिस्थिती, कमला मील आगीनंतर अधिकाऱ्यांच्या मागे लागलेला चौकशीचा फेरा, तसेच नवी तपासणी मोहीम यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कामाचे तास, तणाव, वाढलेले कारकुनी काम याबाबत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या आयुक्तांसमोर ठेवल्या असून, या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी कामबंद आंदोलन करणात आहेत.
मुंबईतील सव्वा कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी केवळ ३ हजार अग्निशमन जवान व अधिकारी आहेत़ मुंबईत दरवर्षी सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना घडतात़ त्यात आग विझविण्याव्यतिरिक्त चौपाटीवर गस्त, तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, इमारत कोसळणे-दरड पडणे अशा आपत्तींतही मदतकार्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागते.
यात भरीस भर म्हणून इमारतींची तपासणी करण्याचे अतिरिक्त काम टाकण्यात आले़ आमचे काम केवळ आग विझविणे आहे, ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या आस्थापनाकडून आग प्रतिबंधक नियमांचे पालन होते का? याची शहानिशा करण्याची जबाबदारी त्या वॉर्डची आहे़ त्यामुळे यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाºयांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत.